Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:33 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 5 : संपूर्ण देशभरात संविधान बचाओ संघर्ष समितीच्यावतीने भारत बंदची हाक मंगळवारी देण्यात आली होती. त्यास कराड शहर, ओगलेवाडी येथे संमिश्र तर तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक प्रक्रिया तर 10 टक्के आर्थिक आधारावर आरक्षण व सरकारविरोधात हा राष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आला होता.
देशभरात संविधान बचाओ संघर्ष समितीच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या समितीच्यावतीने येथील व्यापारी, नागरिकांना दुकाने, दैनंदिन व्यवहार बंद ठेवत कराड बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास संमिश्र प्रतिसाद लाभला.
दरम्यान, संविधान बचाओ संघर्ष समितीच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यापासून वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल, गजानन हौसिंग सोसायटी,  ओगलेवाडी मार्गे कृष्णा नाका, पांढरीचा मारुती,  कन्या प्रशाला, चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक ते दत्त चौक अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  त्यामध्ये  भारिप, भीम आर्मी व अन्य संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सध्याचे सरकार हे घोटाळेबाज असून सर्वोच्च न्यायालयाने बॅलट  पेपरद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. परंतु सत्ताधारी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन करून ईव्हीएम मशीनद्वारे  मतदान घेण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून हे घोटाळेबाज सरकार सत्तेत येत असल्याबाबत संविधान बचाओ संघर्ष समितीने न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात यावी, असे आदेश दिले. तरीही हे सरकार न्यायालयाच्या आदेशाचे  उल्लंघन करीत आहे. त्याचबरोबर भाजप सरकारने आर्थिक मागास समाजाला 10 टक्के दिलेले आरक्षण कोणत्याही निकषावर उतरत नसून हा केवळ राजकीय फार्स केला आहे. शिवाय या आरक्षणामुळे एसी, एसटी,  ओबीसीवर परिणाम होत असल्याने त्यांच्यावर सरकारने अन्याय केला आहे. त्यालाही विरोध दर्शवत अन्य विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता.
दरम्यान, ओगलेवाडी येथे या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील बहुतांशी दुकाने तसेच रिक्षा वाहतूकही बंद होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: