Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

रोमहर्षक लढतीत भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: sp1
5नागपूर, दि. 5 (वृत्तसंस्था) : अत्यंत अटीतटीच्या व शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणार्‍या आजच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला केवळ 242 धावाच करता आल्या. मार्कस स्टॉयनीसचे अर्धशतक (52) आणि पीटर हँड्सकॉम्बची 48 धावांची खेळी मात्र ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. कोहलीचे दमदार शतक आणि बुमराह-विजय शंकरच्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारताने सामना जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा पाचशेवा विजय ठरला आहे.
251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. चांगली सुरुवात करूनही मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार फिंच अपयशी ठरला. त्याने 53 चेंडूत 37 धावा केल्या. मोठा फटका खेळताना तो पायचीत झाला. कुलदीपने फिंचच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंचनंतर लगेचच सलामीवीर उस्मान ख्वाजा तंबूत परतला. त्याला केदार जाधवने बाद केले. ख्वाजाने 37 चेंडूत 38 धावा फटकावल्या. आजच्या सामन्यात संधी देण्यात आलेला अनुभवी शॉन मार्श आपली छाप उमटवण्यात अपयशी ठरला. त्याने 27 चेंडूत 16 धावा केल्या. जाडेजाने त्याला माघारी धाडले. टी-20 मालिकेत भारतासाठी धोकादायक ठरलेला फलंदाज ग्लेन मॅक्सवेल त्रिफळाचीत झाला. आडवा फटका मारण्याच्या नादात त्याला कुलदीप यादवने त्रिफळाचीत केले. अर्धशतकाकडे वाटचाल करणारा पीटर हँड्सकॉम्ब त्यानंतर धावबाद झाला. जाडेजाने अप्रतिम चेंडू फेकून त्याला धावबाद केले. त्याने 59 चेंडूत 48 धावा केल्या. अलेक्स कॅरीदेखील लगेच त्रिफळाचीत झाला. त्याला कुलदीपने माघारी धाडले. तळाच्या फळीतील फलंदाज नॅथन कुल्टर नाईल आणि पॅट कमिन्स हे देखील झटपट बाद झाले. अखेर दडपणाच्या वेळी अर्धशतकवीर मार्कस स्टॉयनीस बाद झाला आणि शेवटी झॅम्पाला बाद करत विजय शंकरने भारताच्या विजयातील अडसर दूर केला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अचूक ठरला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने पहिल षटक निर्धाव टाकत स्फोटक अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला तंबूत पाठवले. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. मॅक्सवेलला गोलंदाजी देणे ऑस्ट्रेलियाचा लाभदायक ठरले. शिखर धवन (21) ला त्याने पायचीत केले. पंचांनी नाबाद ठरवल्याने ऑस्ट्रेलियाने ऊठड ची मदत घेतली. त्यात तिसर्‍या पंचानी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल दिला. लायनच्या पहिल्याच षटकात अंबाती रायडू (18) पायचीत झाला. भारताने ऊठड ची मदत घेतली. पण निकाल भारताच्या विरोधात लागल्याने एकमेव रिव्ह्यू गमावत भारताला तिसरा धक्का बसला.
पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला कर्णधार विराट कोहली आजच्या सामन्यात चमकला. त्याने 55 चेंडूत आपले अर्धशतक ठोकले. पण चांगली सुरुवात करून 46 धावांची खेळी करणारा विजय शंकर कमनशिबी ठरला. कोहलीने लगावलेला चेंडू थेट नॉन स्ट्राईकच्या स्टंपवर आदळला. त्या दरम्यान चेंडू गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करून गेला होता. त्यामुळे विजय शंकर धावबाद झाला. पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारी जोडी केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे एका पाठोपाठ बाद झाले. झॅम्पाने 2 चेंडूत 2 बळी मिळवले. केदार जाधव 11 तर धोनी पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. चौकार लगावत कर्णधार कोहलीने आपले दमदार शतक ठोकले. त्याने 107 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 40 वे शतक ठरले. मात्र शेवटच्या काही षटकात भारताने झटपट गडी गमावले. जाडेजा (21) झेलबाद झाला . त्यानंतर कोहली 116 धावांवर माघारी परतला. तळाचा फलंदाज कुलदीप यादव देखील त्रिफळाचीत झाला. त्याला पॅट कमिन्सने माघारी धाडले. पाठोपाठ बुमराहही शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव 48.2 चेंडूत 250 धावात आटोपला. पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 बळी घेतले.
विराट कोहली ठरला जगातील सर्वोत्तम फलंदाज
नागपूर येथील जामठाच्या खेळपट्टीवर भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. दुसर्‍या सामन्यात भारताच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरस्थावर होता आले नाही. पण कोहलीने दमदार खेळी करत सर्वोत्तम फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
जामठ्याच्या मैदानात यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. पण या सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला. दुसरीकडे कोहलीने अर्धशतकाची वेस ओलांडली आणि त्यानंतर काही वेळात त्याने सर्वोत्तम फलंदाज होण्याचा मान पटकावला.
या मैदानात धोनीच्या सर्वाधिक धावा होत्या. धोनीने चार डावांमध्ये दोन अर्धशतकांसह 268 धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनीला एकही धाव करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाने त्याला पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. या सामन्यापूर्वी कोहलीच्या या मैदानात 209 धावा होत्या. त्यामुळे सामना होण्यापूर्वी कोहली धोनीपेक्षा 59 धावांनी पिछाडीवर होता. कोहलीने या सामन्यात नेत्रदीपक फलंदाजी करत धोनीचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे आता जामठ्याच्या मैदानात सर्वाधिक धावा करणारा कोहली हा अव्वल फलंदाज ठरला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: