Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘एलओसी’वर पाक सैन्याची जमवाजमव
ऐक्य समूह
Thursday, March 07, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: na2
नागरी वस्त्यांना लक्ष्य न करण्याचा भारताचा इशारा
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानची सीमा ओलांडून केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने अफगाणिस्तानची सीमा आणि भारताबरोबरच्या नियंत्रण रेषेवरील काही सेक्टरमध्ये आणखी सैन्य आणि शस्त्रसामग्रीची जमवाजमव सुरू केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाक सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य करू नये, अशी तंबी भारतीय लष्कराने दिला आहे. पाकने नागरी वस्त्यांना यापुढे लक्ष्य केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा कडक इशाराही भारतीय लष्कराने दिला आहे.
पाकिस्तानकडून गेले सलग 13 दिवस नियंत्रण रेषेवर काही निवडक सेक्टरमध्ये तुफान गोळीबार सुरू आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला नागरी वस्त्यांना लक्ष्य न करण्याचा इशारा दिला. त्यानंतर नियंत्रण रेषेवरील परिस्थिती काही प्रमाणात शांत होती; पण गेल्या 24 तासात पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्यासोबत तोफगोळ्यांचा माराही केला.
पाक सैन्याकडून सातत्याने होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कर तोडीस तोड उत्तर देत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत भारतात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.      
भारतीय लष्कर पूर्णपणे व्यावसायिक असून पाकमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात नाही. तेथील नागरिकांची
जीवितहानी टाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, पाकने आमच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करणे थांबवले नाही तर पाक सैन्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा भारतीय सेनाधिकार्‍यांनी दिला आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. पाक सैन्याने बुधवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूँछ जिल्ह्यांमध्ये गोळीबार केला. राजौरीतील सुंदरबनी सेक्टर आणि पूँछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाककडून मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यं तुफानी गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. त्या आधी पाकने मंगळवारी नौशेरा, सुंदरबनी आणि कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाककडून जवळपास तीन तास गोळीबार सुरू होता. त्यात भारताचा एक जवान जखमी झाला आहे. सुंदरबनी सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री 8.30 पासून बुधवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत पाकचा गोळीबार सुरू होता, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: