Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले यशस्वी
ऐक्य समूह
Thursday, March 07, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: na1
हवाई दलाने दिले सॅटेलाईट फोटोसह अन्य पुरावे
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथे ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर केलेल्या हवाई हल्ल्यांचे पुरावे विरोधी पक्षांकडून मागितले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर हवाई दलाने हे हवाई हल्ले यशस्वी झाल्याचे पुरावे केंद्र सरकारकडे सोपवल्याचे वृत्त आहे. या मोहिमेसाठी इस्रायली बनावटीचे ‘स्पाईस 2000’ बॉम्ब वापरले गेले. त्यापैकी 80 टक्के बॉम्बनी अचूक लक्ष्यावर प्रहार केला, असे हवाई दलाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या यशस्वितेबद्दल विदेशी प्रसारमाध्यमांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर हवाई दलाने सरकारकडे सोपवलेले पुरावे महत्त्वपूर्ण आहेत. बॉम्ब ठरवलेल्या लक्ष्यावर पडले नाहीत, हा दावा खोडून काढण्यासाठी हवाई दलाने अहवाल तयार केला आहे. या बॉम्ब हल्ल्यांमध्ये झाडे आणि जंगलाचा भाग वगळता कोणतेही नुकसान झाले नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचे नुकसान झाले नाही तर त्यांच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न का केला, असा प्रश्‍न  हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी
विचारला होता.
या पार्श्‍वभूमीवर हवाई दलाने या हवाई हल्ल्यांच्या यशस्वितेबद्दल केंद्र सरकारला रविवारीच 12 पानी अहवाल सोपवला आहे. उपग्रहाच्या मदतीने हाय रिझोल्यूशन फोटो आणि एसएआर रडारच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंचा यात समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाच्या ‘मिराज 2000’ विमानांनी बालाकोटसह पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद व चाकोटी येथे 26 फेबु्रवारीला हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इस्त्रायली बनावटीच्या ‘स्पाईस 2000’ लेझर गाईडेल बॉम्बचा वापर करण्यात आला. हे बॉम्ब लक्ष्य असलेल्या इमारतींची छपरे भेदून आत पडले. आतमध्ये त्यांचा स्फोट झाला. त्यामुळे जे काही नुकसान झाले ते अंतर्गत भागामध्ये झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर या हल्ल्यांमध्ये झालेल्या नुकसानीबाबत स्वतंत्र सूत्रांकडून मिळालेल्या सॅटेलाईट फोटोंचाही समावेश हवाई दलाने आपल्या अहवालात
केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: