Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वच्छ सर्वेक्षणात कराड देशात प्रथम
ऐक्य समूह
Thursday, March 07, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 6 : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आणि पश्‍चिम विभागासह महाराष्ट्रात लहान शहरांमध्ये कराड शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या एकूण पाच हजार गुणांपैकी कराड शहराला 4063 गुण मिळाले. महाबळेश्‍वरने 8 वा, पाचगणीने 13 वा तर कोरेगाव शहराने 36 वा क्रमांक मिळवला आहे.
दिल्ली येथे विज्ञान भवनात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आवास आणि विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते कराड पालिकेचा गौरव करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील एकूण चार शहरांनी राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके पटकावल्याने नागरिकांनी जल्लोष केला.
कराडच्या नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, बांधकाम समितीचे सभापती हणमंतराव पवार, आरोग्य समितीचे सभापती गजेेंद्र कांबळे, विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. स्मिता हुलवान, मुख्याधिकारी यशवंत डागे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशात प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती समजताच कराड शहरात नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
हायटेक स्वच्छतागृहे, शंभर टक्के हागणदारीमुक्त शहर, प्लास्टिकमुक्त  शहर, कचरा संकलन, कचरा वर्गीकरण, कचर्‍यापासून खत व वीज-निर्मिती, कचरा डेपोमुक्त शहर यामुळे कराडला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: