Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहशतवादी हाफिज सईदवरील बंदी कायम
ऐक्य समूह
Friday, March 08, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: na1
संयुक्त राष्ट्रांचा पाकिस्तानला दणका
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जमात-उद-दावा’ व ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या हाफिज सईदचे नाव बंदी घातलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे.
पाकिस्तान सरकारने दोनच दिवसांपूर्वी हाफिज सईदच्या ‘फलाह-इ-इन्सानियत फौंडेशन’ या कथित धार्मिक संस्थेवर अधिकृतरीत्या बंदी आणल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने हाफिजचे नाव वगळण्यास नकार दिला आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक असलेल्या हाफिज सईदविरोधात संयुक्त राष्ट्रांकडे भारताने गोपनीय माहितीसह सबळ पुरावे दिले आहेत. त्यामध्ये त्याच्या हालचालींसह दहशतवादी कारवायांचा समावेश आहे. त्यामुळेच हाफिज सईदचा अर्ज संयुक्त राष्ट्रांकडून फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांनी हा निर्णय हाफिजचा वकील हैदर रसूल मिर्झा याला या आठवड्याच्या सुरुवातीलाच कळवला आहे.
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर यांच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळालेल्या फ्रान्सने अमेरिका व ब्रिटनच्या सहकार्याने आणला आहे. त्याच वेळी हाफिज सईदची मागणी फेटाळली गेल्याने पाकला मोठा दणका बसला आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 10 डिसेंबर 2008 रोजी ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातली. त्यानंतर हाफिज सईदने लाहोरमधील मिर्झा या कायदे विषयक सल्लागार कंपनीच्या माध्यमातून 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रात याचिका करत आपल्यावरील बंदी उठवण्याची मागणी केली होती. सईदच्या या मागणीला भारतासह अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्रांमध्ये विरोध केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: