Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फरारी गुंड मयूर साळुंखेस अटक
ऐक्य समूह
Friday, March 08, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: re2
पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त
5मसूर, दि. 7 : खुनाचा प्रयत्न आणि खंडणी असे गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे करून एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरारी असणार्‍या संशयित आरोपीस उंब्रज पोलिसांनी सापळा रचून नाट्यमयरीत्या अटक केली असून  त्याच्याकडून पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मयूर महादेव साळुंखे (रा. कालगाव, ता. कराड) असे संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, की दि. 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मयूर साळुंखे हा आपल्या 10 ते 12 साथीदारांसमवेत कवठे येथील शेतकरी शशिकांत तानाजी शेलार यांच्या घरी जाऊन शशिकांत शेलार यास बाहेर बोलावले. त्याचे कपाळास पिस्तूल लावून तू प्रवीण साळुंखे यास कोर्ट कामात  पैशाची मदत करतोस, मला पण दोन लाख रुपये दे, नाही तर तुला जीवे मारीन अशी धमकी देऊन त्याच्या दिशेने पिस्तूल रोखले होते.
शेलार यांनी उंब्रज पोलिसात फिर्याद दिली होती. शेलार यांच्या फिर्यादीवरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा व खंडणी मागितलेचा गुन्हा मयूर साळुंखे याच्यावर दाखल करण्यात आला होता. दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नवीन कवठे येथील श्रीमती प्रभावती शामराव साळुंखे यांच्या घरावर मयूर साळुंखे यांनी आपले दहा ते बारा साथीदार घेऊन दगडफेक करून दहशत माजवली होती.  प्रभावती साळुंखे व त्यांच्या कुटुंबीयांना पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची फिर्याद प्रभावती साळुंखे यांनी पोलिसात  दिली होती.
प्रभावती साळुंखे आणि शशिकांत शेलार या दोघांच्या फिर्यादीवरून मयूर साळुंखे व त्याच्या साथीदारांविरुद्ध उंब्रज पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, खंडणी शस्त्र अधिनियम यानुसार गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मयूर साळुंखे साथीदारांसमवेत पोलिसांना गुंगारा देत फरारी झाला होता. मयूर साळुंखे पुणे बाजूकडून कराड बाजूकडे गाडीने प्रवास करत असल्याची माहिती पोलीस हवालदार जगधने यांना मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरड यांनी कर्मचार्‍यांसह तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक मोरे यांच्या साह्याने तासवडे टोलनाक्यावर सापळा रचला.
मिळालेल्या माहितीच्या वर्णनची गाडी थांबवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयूर साळुंखे यास पकडले.  सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरड करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: