Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटणमध्ये अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, March 08, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: re3
शहरातील वाहतूक कोंडीने घेतला बळी
5फलटण, दि. 7 : फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते श्रीराम सहकारी साखर कारखाना या मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीने गुरुवारी दुपारी विनायक आकोबा शिंदे (वय 75, रा. विडणी) या निवृत्त वृद्ध सैनिकाचा बळी घेतला. शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी आणि रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
फलटण-पंढरपूर मार्गावर श्रीराम सहकारी साखर कारखाना परिसरातील ऊस वाहतुकीच्या वाहनांची वर्दळ, शहराकडे येणारी व शहरातून जाणारी सर्व प्रकारची वाहने, उसाचे वाढे विक्रेते आणि खरेदीदार, त्यांची वाहने यामुळे या परिसरात रोज दुपारपासून वाहतूक कोंडी होत आहे. दहा बिघे, विडणी, ता. फलटण येथे  कुटुंबीयांसह राहणारे विनायक आकोबा शिंदे (वय 75) हे सैन्यदलातील निवृत्त सैनिक आपल्या टीव्हीएस एक्सेल (एमएच-11-एटी-5896) या दुचाकीवरून धान्याचे ठिके घेऊन गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास घराकडे परतत होते. त्यावेळी पाठीमागून डांबरीकरणासाठी खडी घेऊन निघालेल्या हायवा ट्रकचा (एमएच-11-एल-8200) धक्का लागल्याने विनायक शिंदे हे रस्त्यावर पडले. दुर्दैवाने त्यांच्या डोक्यावरून हायवा ट्रकचे पाठीमागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक गाडी सोडून फरार झाला. प्रेमजित अभंग यांनी या अपघाताची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
सैन्यदलात 20 वर्षे देशसेवा केल्यानंतर निवृत्त झालेले विनायक शिंदे हे विडणी येथे कुटुंबीयांसोबत शेती करत होते. मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध जोडण्याचा स्वभावामुळे त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच विडणी पंचक्रोशीवर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या अपघाताची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: