Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मदन भोसले यांचा उद्या भाजप प्रवेश?
ऐक्य समूह
Friday, March 08, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: re1
‘किसनवीर’वर कार्यक्रमाची जय्यत तयारी : मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
5भुईंज, दि.7 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 9) होणार्‍या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशासाठी गुरुवारीसुद्धा राज्यभरातील नेते व मदन भोसले समर्थकांचा दिवसभर राबता पाहायला मिळाला.
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शनिवार, दि. 9 रोजी डिस्टिलरी नं. 3 चा शुभारंभ व विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी दिवसभर किसनवीरच्या कार्यस्थळावर हॅलिपॅड, मंडप व्यवस्था व सुरक्षा यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता श्रीकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, तहसीलदार रणजित भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे   अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आव्हाड, भुईंजचे स.पो.नि. शाम बुवा, दुर्गानाथ साळी यांच्यासह मोठा फौजफाटा व शासकीय अधिकार्‍यांनी गुरुवारी दिवसभर सुरक्षितता व वाहतूक व्यवस्था यांच्या नियोजनाच्या सूचना दिल्या.
दुसर्‍या बाजूला या व्यासपीठावरून किसनवीर उद्योग समूहाचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले हे आपल्या नव्या राजकीय इनिंगसाठी सज्ज होत आहेत. त्यांचा भाजप प्रवेश हा किसनवीर कार्यक्षेत्रातील 52 हजार सभासदांच्या अस्तित्वाबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरे घडवणारा ठरणार असल्याने राज्यातील अनेक नेते व मदन भोसले समर्थक गुरुवारी दिवसभर कारखाना कार्यस्थळावर उपस्थित होते. गाव पातळीवरील सामान्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत’ सर्व जण कानोसा घेत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन स्वतः मदन भोसले हे संचालकांच्या समवेत बारकाईने करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: