Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंडणीच्या गुन्ह्यात एक वर्ष फरारी असलेल्या दोन संशयितांना अटक
ऐक्य समूह
Friday, March 08, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 7 : खंडणी, गोळीबार आणि खुनाचा प्रयत्न करून गेले वर्षभरापासून फरार असलेल्या युवराज सर्जेराव साळवी (वय 38, रा. कोपर्डे हवेली, ता.  कराड) आणि त्याचा साथीदार सूर्यकांत उर्फ बाळू आबाजी कांबिरे (वय 34, रा. कांबिरेवाडी) या दोघांना कराड पोलिसांनी गुरुवारी अटक केली. न्यायालयाने दोघांना 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.         
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तर कोपर्डे गावच्या हद्दीत युवराज साळवे याने स्कार्पिओ गाडी आडवी मारून महेश गायकवाड (रा. सैदापूर) यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही घटना 19 मार्च 2018 रोजी घडली होती. गायकवाड यांनी खंडणी देण्यास विरोध केल्यावर युवराज साळवी, बाळू कांबिरे व इतर चौघांनी गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या हिसकावल्या होत्या. महेश गायकवाड हे जीवाच्या भीतीमुळे पळून जात असताना त्यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून  गोळीबार करण्यात आला होता. युवराज साळवी व त्याच्या टोळीविरोधात महेश गायकवाड यांनी दि. 19 मार्च 2018 रोजी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तेव्हापासून सर्व संशयित फरारी होते. पोलिसांना आज दोघांची माहिती लागल्यानंतर युवराज साळवे व बाळू कांबिरेला त्यांनी अटक केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: