Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या प्रकरणी मध्यस्थांची नियुक्ती
ऐक्य समूह
Saturday, March 09, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: mn1
आठ आठवड्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीचा वाद मध्यस्थीने सोडवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने दिले आहेत. मध्यस्थ म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एफ. एम. आय. खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत आध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. हा निर्णय झाल्यापासून एका आठवड्यात या समितीने आपले कामकाज सुरू करावे आणि आठ आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही घटनापीठाने दिले आहेत.
 सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर अयोध्या खटल्याची सुनावणी झाली. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मध्यस्थांची नावे सुचवण्याचे निर्देश या खटल्याशी संबंधित सर्व पक्षकारांना दिले होते. त्यानुसार कालच अनेक पक्षकारांनी विविध मध्यस्थांची नावे सुचवली होती. त्यावर निर्णय घेत घटनापीठाने आज त्रिसदस्यीय मध्यस्थ समितीची स्थापना केली. ही संपूर्ण प्रक्रिया उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे होईल, असेही घटनापीठाने स्पष्ट केले. या वादामध्ये तडजोड करण्यासाठी मध्यस्थांची नेमणूक करण्यात कोणतेही कायदेशीर अडथळे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत गोपनीयता पाळावी. ही संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ (बंदिस्त खोलीत) पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.
त्याचबरोबर मध्यस्थ प्रक्रियेचे कोणत्याही प्रकारचे वार्तांकन मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांना करता येणार नाही. मध्यस्थीचे कामकाज या समितीने या निर्णयापासून एका आठवड्यात सुरू करावे आणि त्यानंतरच्या  आठ आठवड्यांमध्ये आपला अहवाल न्यायालयाला सादर करावा. चार आठवड्यानंतर समितीने प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही घटनापीठाने दिले आहेत. या समितीला गरज वाटल्यास मध्यस्थ म्हणून आणखी सदस्य नियुक्त करता येतील. हा वाद सामंजस्याने सोडवण्याचे सगळे प्रयत्न या समितीने करायचे आहेत. त्यासाठी आवश्यक ते कायदेविषयक सहकार्य घेण्याचा पूर्ण अधिकार मध्यस्थ समितीला असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मध्यस्थांना उत्तर प्रदेश सरकारने सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवाव्यात, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गरज असेल तर कुणीही मध्यस्थ कायदेशीर मदतही मागू शकतो असेही घटनापीठाने स्पष्ट केले आहे.
हे आहेत समितीचे सदस्य
न्या. फकीर मोहम्मद इब्राहिम खलिफुल्ला : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एफ. एम. आय. खलिफुल्ला मूळचे तमिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडीचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 23 जुलै 1951 रोजी झाला. त्यांनी 20 ऑगस्ट 1975 मध्ये वकिली व्यवसाय सुरू केला. त्यांचा कामगार कायद्याचा गाढा अभ्यास आहे. न्या. खलिफुल्ला यांची सुरुवातीला मद्रास उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांची जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक झाली. 2000 मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी करण्यात आली होती.
श्रीराम पंचू : श्रीराम पंचू हे ज्येष्ठ वकील आहेत. यापूर्वी पंचू यांनी अनेक प्रकरणांमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडली आहे. मध्यस्थी करण्यात ते वाकबगार समजले जातात. त्यांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडण्यासाठी ‘द मीडिएशन चेंबर्स’ नावाची कायद्याशी संबंधित संस्था स्थापन केली आहे. अनेक वाद न्यायालयाबाहेर मध्यस्थी करून सोडवण्याचे काम ही संस्था करते. पंचू हे देशातील जुन्या मध्यस्थांपैकी एक आहेत. पंचूंनी देशातील अनेक अतिमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये मध्यस्थी केली आहे. आसाम आणि नागालँड यांच्यात 500 कि.मी.च्या भूभागाचे प्रकरण सोडवण्यासाठी त्यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती झाली होती. हा वाद सामंजस्याने सोडवण्यात त्यांनी यश मिळवले होते.
श्री श्री रविशंकर : आध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत. त्यांचा समावेश अयोध्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या मध्यस्थ समितीत करण्यात आला आहे. रविशंकर यांनी यापूर्वी वैयक्तिक स्तरावर अयोध्या प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यांचे नाव मध्यस्थ म्हणून पुढे आल्यानंतर निर्मोही आखाडा, अनेक साधू-संत आणि ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या नावाला विरोध केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: