Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

विराट कोहलीचे शतक व्यर्थ
ऐक्य समूह
Saturday, March 09, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: sp1
5रांची, दि. 8 (वृत्तसंस्था) : भारताचा माजीकर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीत झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्टेलियाने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. 314 धावांच्या कडव्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 281 धावात आटोपला. कर्णधार विराट कोहलीने 123 धावांची दमदार खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे भारताचा पराभव झाला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतरही भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी राखली आहे. दरम्यान, एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करणार्‍या उस्मान ख्वाजाला सामनावीर घोषित करण्यात आले.
314 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या भारताला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन एक धाव करून बाद झाला. ‘हिटमॅन’ रोहित शर्मा 14 धावांवर पायचित झाला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावत चांगली सुरुवात केली; पण तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यानंतर अंबाती रायुडूचा दोन धावांवर त्रिफळा उडाला. कमिन्सने त्याचा अडथळा दूर केला.
रांचीच्या मैदानावर सामना असल्याने ‘लोकल बॉय’ महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर सार्‍यांचे लक्ष होते; पण चांगली सुरुवात केल्यानंतर तो अ‍ॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 42 चेंडूत 26 धावा केल्या. एकीकडे गडी बाद होत असताना कोहलीने आपली लय कायम राखली. त्याने 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. धोनीनंतर त्याला मराठमोळ्या केदार जाधवची साथ मिळाली. ही जोडी भारताला विजयाच्या समीप नेणार असे वाटत असतानाच केदार जाधव झम्पाच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 39 चेंडूत 26 धावा केल्या.
दुसर्‍या बाजूला कर्णधार कोहलीने आपला झंझावात सुरू ठेवत या मालिकेत सलग दुसर्‍यांदा धडाकेबाज शतक ठोकले. मात्र, तो त्रिफळाचित झाल्यानंतर भारताच्या आव्हानातील हवाच निघून गेली. कोहलीने 95 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि एक षटकार ठोकला. या शतकासह कोहलीने एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी या तिन्ही प्रकारात मिळून 29 हजार धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर एकदिवसीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वेगात चार हजार धावांचा टप्पाही गाठला. कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 41 वे शतक झळकवले असून आता सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 9 शतकांची गरज आहे.
कोहली बाद झाल्यावर रवींद्र जडेजा आणि विजय शंकर या जोडीवर भारताची मदार होती. मात्र, धावगती आवाक्याबाहेर जात असल्याने विजय मोठा फटका खेळायला गेला आणि बाद झाला. त्याने 32 धावा केल्या. जडेजाही फटकेबाजी करताना बाद झाला. त्याने 31 चेंडूत 24 धावा केल्या. पाठोपाठ शमी व कुलदीप यादवदेखील बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, अ‍ॅडम झम्पा व झाय रिचर्डसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फटकेबाजी करत भारताला विजयासाठी 314 धावांचे आव्हान दिले. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक (104) आणि कर्णधार अ‍ॅरोन फिंचची 93 धावांची खेळी, यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 5 बाद 313 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलही 31 चेंडूत 47 धावांची झंझावती खेळी केली. एक वेळ ऑस्ट्रेलियाचा संघ 350 धावांचा पल्ला गाठेल, अशी शक्यता होती. मात्र, शेवटच्या 15 षटकात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला काहीसा लगाम घातला. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक 3 बळी टिपले. भारताचा कर्णधार विराट कोहली याने मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय चांगलाच अंगलट आला.
भारतीय खेळाडूंची सुरक्षा दलांना मानवंदना
दरम्यान, पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आणि भारतीय सुरक्षा दलांना मानवंदना म्हणून सर्व भारतीय खेळाडूंनी आजच्या सामन्यात ‘आर्मी कॅप्स’ परिधान केल्या होत्या. क्षेत्रीय सेनेत मानद लेफ्टनंट कर्नल असलेल्या महेंद्रसिंगधोनीच्या हस्ते या कॅप्स खेळाडूंना वितरित करण्यात आल्या. त्याचबरोबर सुरक्षा दलांमधील जवानांच्या कुटुंब कल्याणासाठी सर्व खेळाडूंनी आजच्या सामन्याचे मानधन संरक्षण दलांसाठीच्या निधीसाठी देऊन भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: