Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंचायत समितीच्या महिला सदस्यांचे काम प्रेरणादायी : मिलिंद कदम
ऐक्य समूह
Saturday, March 09, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : सातारा पंचायत समितीमध्ये 9 महिला सदस्य कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी आपआपल्या गणात केलेली विकासकामे प्रेरणादायी अशीच आहेत, असे प्रतिपादन सभापती मिलिंद कदम यांनी केले.
सातारा पंचायत समितीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. गटविकास अधिकारी अमिता गावडे, सदस्या सौ. सरिता संभाजी इदंलकर, सौ. वसुंधरा सजंय ढाणे, सौ. अलका रवींद्र बोभाटे, सौ. रेखा दत्तात्रय शिंदे, सौ. छाया हणमंत कुंभार, सौ. विद्या तानाजी देवरे, विजया माधवराव गुरव, बेबीताई महेश कुंभार, सौ. कांचन सुभाष काळे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
मिलिंद कदम  म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना राजकारणात 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज महिलांना मंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आदी पदे भूषवण्याचा मान मिळाला आहे.मुळात सातारा पंचायत समितीला राज्य शासनाकडून अत्यंत कमी निधी दिला जातो. त्यामुळे या निधीचे वाटप करताना महिला सदस्यांना प्राधान्य देण्याची भूमिका आम्ही नेहमीच घेतली.
सातारा पंचायत समितीच्या महिला सदस्या अत्यंत कल्पक आणि अभ्यासू आहेत. गणामधील विकासकामांचा आराखडा तयार करून कोणत्या कामाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, याबाबत त्या सजग आहेत. सातारा पंचायत समितीचा कारभार करीत असताना आमच्या महिला सदस्यांचा नेहमीच सन्मान केला जातो हे आजच्या महिला दिनी नमूद करणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
राहुल शिंदे म्हणाले, सातारा पंचायत समितीमध्ये 9 महिला सदस्य कार्यरत असताना गटविकास अधिकारीही महिला  लाभल्या हा योगायोग आहे. सभागृहामध्ये महिला सदस्य असल्यामुळे अन्य सदस्य आणि प्रशासनावर नैतिक दबाव राहण्यास मदत होत आहे. महिला सदस्या खूप सक्रिय आहेत. विकासकामात त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
सत्काराला उत्तर देताना सौ. रंजना जाधव म्हणाल्या, सातारा पंचायत समितीमध्ये काम करताना अधिकारी आणि पदाधिकारी यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य होते. मी स्वतः भाजपाच्या चिन्हावरून निवडून आली आहे, मात्र या ठिकाणी विकासकामे करताना राजकारण केले जात नाही, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. आजच्या जागतिक महिला दिनी मी शासनाला आवाहन करू इच्छिते, की पंचायत समितीला देण्यात येणार्‍या निधीमध्ये भरघोस वाढ करावी.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: