Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते
ऐक्य समूह
Monday, March 11, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते. ते भाषणाची सुपारी घेतात. त्यांच्या भाषणाने विचलित होऊ नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. लोक राज ठाकरेंना ऐकतही नाहीत आणि त्यांना मतही देत नाहीत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे आहेत. त्यांच्याकडे पाहून थुंकल्यास ते आपल्यावरच पडते, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबई येथे भाजपच्या महिला मेळाव्यात बोलत होते. राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. यावेळी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज याही उपस्थित होत्या.
राज ठाकरे हे फक्त कलाकार आहेत. ते 12 वा खेळाडूही नाहीत आणि नॉन प्लेईंग कॅप्टनही नाहीत. त्यांना एक खासदार, आमदार अथवा नगरसेवकही निवडून आणता येत नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे. भारतावरील हल्ल्यानंतर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. भारत बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय, असे सांगत लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले. 50 वर्षांत जे घडले नाही ते मागील 5 वर्षांत घडले. यावेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती 45 जागा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: