Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला...!
ऐक्य समूह
Monday, March 11, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: mn1
सात टप्प्यात मतदान; महाराष्ट्रात मतदानाचे चार टप्पे, 23 मे रोजी निकाल
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा असून  सदस्य संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणार्‍या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज केली. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलपासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. 18 एप्रिलच्या दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यातील 97 मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सामोरे जातील. तिसर्‍या टप्प्यात 14 राज्यांमधील 115 मतदारसंघात मतदार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील. 29 एप्रिलला होणार्‍या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यातील 71 जागांसाठी मतदान होईल. 6 मे रोजी होणार्‍या पाचव्या टप्प्यात राज्यांमधील 51 मतदारसंघ, 12 मे रोजी होणार्‍या सहाव्या टप्प्यात सात राज्यांमधील 59 मतदारसंघ आणि 19 मे रोजीच्या अंतिम टप्प्यात आठ राज्यांमधील 59 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल.
आंध्रप्रदेश, अरुणाचल, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागलँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तमिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगर, दीव-दमण, लक्षद्वीप, दिल्ली, पुद्दुचेरी आणि चंदीगड या 22 राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. कर्नाटक, मणिपूर, राजस्थान आणि त्रिपुरात दोन टप्प्यात मतदान होईल. तीन टप्प्यात मतदान होणार्‍या राज्यांमध्ये आसाम व छत्तीसगढ या राज्यांचा समावेश आहे. झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशात चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संवेदनशील परिस्थितीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल. बिहार, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगढ या आकारमानाने विशाल राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यामुळे आजपासून देशभरात आचार-संहिता लागू झाली आहे. यंदा मतदारांची संख्या 90 कोटींनी वाढली आहे. यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणार्‍या नवमतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. 282 मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर नवमतदारांमुळे प्रभाव पडणार आहे. या निवडणुकीत देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांसोबत व्हीव्हीपॅटही उपलब्ध असेल. तसेच ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रवासादरम्यान ही यंत्रे जीपीएसच्या साहाय्याने ट्रॅक करण्यात येणार आहेत.
आचारसंहितेचे उल्लंघन करणार्‍यांवर
कडक कारवाई
केंद्रीय निवडणूक आयुक्त अरोरा म्हणाले, राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे. देशातील मतदारांची संख्या सुमारे 90 कोटींपर्यंत आता गेली आहे. दीड कोटी नोकरदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. विविध राज्यातील परीक्षांचाही मतदानाच्या तारखा नियोजित करण्यापूर्वी विचार करण्यात आला. 2014 पेक्षा 7 कोटी मतदार वाढले आहेत. लोकसभेसाठी 10 लाख मतदान केंद्र असणार आहेत. ईव्हीएमवर उमेदवारांचा फोटोही असणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. आचारसंहिता भंग झाल्यास त्याची तक्रार मोबाईलवरूनही करता येणार आहे. ईव्हीएमवर जीपीएसच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. पेड न्यूजवर कडक कारवाई केली जाईल.
सर्वांचा अंदाज खोटा ठरला
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या सर्वच मंत्र्यांना विकासकामांची उद्घाटने 8 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश बजावले होते. त्यामुळे 9 मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने आज सकाळी पत्रकार परिषदेची घोषणा केली. त्यानंतर नियोजित वेळेप्रमाणे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.    
देशभरातील सध्याच्या पक्षानुसार जागा
भाजप-267, काँग्रेस-44, अण्णाद्रमुक-37, तृणमूल काँग्रेस-34, बिजू जनता दल-18, शिवसेना-18, तेलुगू देसम पक्ष-15, तेलंगणा राष्ट्रीय समिती-10, माकप-9, समाजवादी पक्ष-7, लोक जनशक्ती पक्ष-6, राष्ट्रवादी-6, राष्ट्रीय जनता दल-4, आप-4, वायएसआर काँग्रेस-4,  शिरोमणी अकाली दल-4, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट-3, अपक्ष-3, राष्ट्रीय लोक समता पक्ष-3,अपना दल-2, इंडियन नॅशनल लोक दल-2, इंडियन युनियन मुस्लीम लीग-2, जनता दल (सेक्युलर)-2, जनता दल (युनायटेड)-2, झारखंड मुक्ती मोर्चा-2, जम्मू काश्मीर पीडीपी-1, एनडीपीपी-1, पट्टाई मक्कल काटची-1, राष्ट्रीय लोक दल-1, रेव्होेल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी-1, सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट-1, स्वाभिमानी शेतकरी संघटना-1,एमआयएम-1,एनआर काँग्रेस-1, भाकप-1, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स-1, नामांकनप्राप्त अँग्लो इंडियन (भाजप)-2, रिक्त-24.
महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल पहायचे झाल्यास महाराष्ट्रात एकूण (48)  जागा आहेत यामधील भाजपकडे 22, शिवसेना 18 राष्ट्रवादी - 05, काँग्रेस - 02 तर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एका जागेवर खासदार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: