Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसबरोबर कोणत्याही राज्यात युती नाही
ऐक्य समूह
Wednesday, March 13, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांंची मोट बांधून महाआघाडी करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सुरुंग लावला आहे. लोकसभा निवडणुकीत बसप काँग्रेसबरोबर कोणत्याही राज्यात आघाडी करणार नाही, अशी घोषणाच मायावतींनी केली आहे. दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमधील सर्व 42 जागांवर आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी घोषित केल्याने काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज एक निवेदन जारी करून काँग्रेससोबत कोणत्याही राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले. समाजवादी पक्षासोबत उत्तर प्रदेशात केलेल्या आघाडीचा उल्लेख करताना ही आघाडी एकमेकांबाबत आदर आणि प्रामाणिक हेतूंवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. 
केवळ निवडणुकीतील फायद्यासाठी आपला पक्ष काँग्रेससोबत आघाडी करणार नाही. त्यामुळे बसपच्या चळवळीची हानी होईल. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करण्यासाठी सप-बसप आघाडीच पुरेशी असल्याने काँग्रेससोबत आघाडी करायचे काहीएक कारण नाही, असेही मायावतींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमधील सर्व 42 लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली. हादेखील काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: