Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रणजितसिंह मोहिते यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
ऐक्य समूह
Wednesday, March 13, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: mn2
गिरीश महाजनांना भेटल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : माढ्याच्या उमेदवारीचा गुंता वाढलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांच्या पाठोपाठ रणजितसिंहदेखील भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांनीही आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने माढ्यातील उमेदवारीचा तिढा आणखी वाढला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते- पाटील यांना उमेदवारी देण्यास पक्षातूनच मोठा विरोध आहे. बबनदादा शिंदे यांचाही त्यांना विरोध आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेदेखील येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तेथे कोणालाही उमेदवारी दिली तरी गटबाजी अटळ असल्याने स्वतःच तेथून निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता; परंतु अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी मावळ मतदारसंघातून लढण्याचा हट्ट धरल्याने एकाच कुटुंबातील तीन तीन उमेदवार नको म्हणून शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे तेथील सर्व इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांचे नाव निश्‍चित होणार, अशी चर्चा सुरू होताच विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आणि युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या ‘शिवनेरी’ या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राष्ट्रवादीत गोंधळ उडाला आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी साखर कारखान्याच्या अनुदानाबाबत चर्चा करण्यासाठी आपली भेट घेतल्याचा दावा करताना गिरीश महाजन त्यांच्या प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील खरेच भाजपमध्ये जाणार, की राष्ट्रवादी काँग्रेसवरील दबाब वाढवण्यासाठी त्यांनी मुद्दाम ही खेळी केली आहे, याबाबत तर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते याबाबत काहीही बोलायला तयार नसले तरी रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: