Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोदींच्या होम पिचवरून प्रियांकांचा भाजपवर हल्ला
ऐक्य समूह
Wednesday, March 13, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: na2
काँग्रेसने फुंकले गुजरातमधून निवडणुकीचे रणशिंग
5गांधीनगर, दि. 12 (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पदार्पणाच्या राजकीय सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होम पिच असलेल्या गुजरातमधून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. देशात द्वेषाचे राजकारण करून लोकांमध्ये फूट पाडली जात आहे, अशी घणाघाती टीका प्रियांका यांनी केली. ही निवडणूक तुमचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे जागरूक रहा. मतदान हेच तुमचे शस्त्र असून ते नीट वापरा, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने तब्बल 58 वर्षांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अहमदाबाद येथे घेतली. त्यानंतर गांधीनगर येथील जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी अवघ्या दहा मिनिटांच्या भाषणात भाजपवर हल्ला केला. या दोन महिन्यात अनेक वायफळ मुद्दे मांडले जातील. मात्र, ज्यांनी मोठमोठी आश्‍वासने दिली, त्या नेत्यांना जनतेने नेमके प्रश्‍न विचारले पाहिजेत. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात येणार होते, त्याचे काय झाले? दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्‍वासन देण्यात आले होते, त्याचे काय झाले, असे प्रश्‍न प्रियांकांनी उपस्थित केले. हा देश तुमचा आहे. यावेळी तुम्हाला जागरूक रहावे लागेल. तुम्हीच तुमचे भवितव्य ठरवणार आहात, एवढे लक्षात असू द्या, असे आवाहन प्रियांका यांनी केले.
मी काही भाषण देणार नाही तर थेट माझ्या मनातील भावना केवळ तुमच्याजवळ व्यक्त करणार आहे. देशातील सध्याचे वातावरण पाहिल्यानंतर मला दु:ख होते. देशात सगळीकडे द्वेष पसरवला जातोय. देशातील घटनात्मक संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत. मात्र, देशातील जनता द्वेषाचे वारे घालवून त्याचे रूपांतर प्रेम आणि सलोख्यात करण्यास सक्षम आहे. आज मी प्रथमच गुजरातमध्ये आले. प्रथमच साबरमती आश्रमाला भेट दिली. येथूनच महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ उभारली होती. देशासाठी बलिदान देणार्‍या शहिदांबद्दल विचार करताना माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. आपला देश प्रेम, करुणा आणि सद्भावनेमुळे तरला आहे. या निवडणुकीत फुटकळ मुद्दे उपस्थित केले जातील. मात्र, तुम्ही सतर्क रहा. तुमचे मत हेसुद्धा असे शस्त्र आहे, की  या शस्त्राने कुणी दुखावले जाणार नाही तर ते प्रत्येकाला मजबूत करेल. या लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणाला निवडून आणणार, यावर सखोल आणि जबाबदारीने विचार करा, असे आवाहन त्यांनी केले. हा देश शेतकरी, माझ्या भगिनी यांनी विकसित केला आहे. 
त्यांनी पहाटेपासून रात्रीपासून देशासाठी कष्ट उपसले
आहेत. माझ्या बंधूंनी कठोर परिश्रमातून हा देश घडवला आहे. इतर कोणीही हा देश घडवलेला नाही. तुम्ही तुमची जबाबदारी
ओळखा. ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ आहे. या देशाच्या विकासासाठी मतदान करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे, असे आवाहनही
त्यांनी केले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल करताना जीएसटी, नोटाबंदी, राफेल करारातील कथित गैरव्यवहार, बेरोजगारी या मुद्द्यांचा उल्लेख केला. मोदींनी त्यांच्या 15 उद्योगपती मित्रांचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी उद्योगपतींच्या कर्जाचा हाच आकडा दीड लाख कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले होते. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. मोदी स्वतः पीडित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात; पण प्रत्यक्षात त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची जनता पीडित झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. या सभेत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तत्पूर्वी, अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. साबरमती आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली. तब्बल 58 वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या आधी 1961 मध्ये भावनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: