Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेर सुजय विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश
ऐक्य समूह
Wednesday, March 13, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: mn1
नगरमधून लोकसभा लढणार; काँग्रेसला जबर धक्का
5मुंबई,  दि. 12 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास ठाम नकार दिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय यांचे पक्षात स्वागत करताना नगरमधून त्यांची उमेदवारीही जाहीर केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बसलेला हा जबर धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची तयारी पक्ष नेतृत्वाकडे दर्शवल्याचे समजते. दरम्यान, भाजपने डॉ. सुजय विखे यांना पक्षात घेतले असताना शिवसेनेने राधाकृष्ण विखे-पाटील यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
डॉ. सुजय विखे यांनी नगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा पूर्वीच केली होती. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने अडचण होती. ही जागा मिळावी यासाठी काँग्रेसने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालवले होते; परंतु नगर जिल्ह्यातील दोनपैकी एक जागा आधीच काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास ठाम नकार दिला.     
 राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेवटपर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. अखेरचा पर्याय म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही त्यांनी काल भेट घेतली होती. मात्र, तोडगा निघाला नाही. अखेर आज डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपचे नगरमधील आमदार उपस्थित होते. हा आपला व्यक्तिगत निर्णय असून वडिलांच्या, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन हा निर्णय घेतल्याचे डॉ. सुजय यांनी सांगितले.
गेले महिनाभर माझ्याबाबत चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, देशाच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्याची क्षमता, यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश दिल्याबद्दल सुजय विखे यांनी सर्वांचे आभार मानले. अडचणीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडिलांप्रमाणे मला साथ दिली. मोठा आधार, सल्लाही दिला. त्यांची साथ मी कधीच सोडणार नाही. त्यांच्यासोबत मी कायम उभा राहणार आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात भाजप मजबूत करणार असून नगरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून आणणारच, असा विश्‍वासही सुजय यांनी व्यक्त केला.
युतीच्या 45 जागा निवडून आणणार
डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे एक तरुण, तडफदार आणि उच्चशिक्षित नेतृत्व पक्षाला मिळाल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत जी कामे झाली त्याचा परिणाम म्हणून मोदींचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे. इतर पक्षांना आता उमेदवारही सापडत नाहीत, अशी वेळ आली आहे. देशात आणि राज्यात 2014 पेक्षा अधिक जागा भाजपाला मिळतील. 2014 मध्ये महाराष्ट्रात युतीला 42 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत युतीला 45 जागा मिळणारच, असा विश्‍वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
डॉ. सुजय यांची उमेदवारी घोषित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरमधून डॉ. सुजय यांची उमेदवारीही घोषित केली. नगर लोकसभेसाठी सुजय यांचे नाव भाजपच्या प्रदेश संसदीय मंडळाकडून केंद्रीय संसदीय मंडळाला कळविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील हे मंडळ उमेदवारीचा अंतिम निर्णय घेते; पण आम्हाला विश्‍वास आहे, की सुजय यांचे नाव अंतिम करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: