Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिवंत बहिणीला मृत दाखवून विम्याची रक्कम हडप करण्याचा भावाकडूनच प्रयत्न
ऐक्य समूह
Wednesday, March 13, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: re1
वाई पोलिसांकडून भावासह दोघांना अटक व पोलीस कोठडी
5वाई, दि. 12 : आर्थिक मोहाच्या लोभापायी एलआयसी एजंटच्या मदतीने भावाने सख्ख्या बहिणीला जिवंतपणीच मयत दाखवून विम्याची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रकाश श्रीपती मांढरे (रा. मांढरदेव) व जावली पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती, एलआयसी एजंट अजय धर्मराज शिर्के (रा. वडाचे म्हसवे, ता. जावली) यांना वाई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रंगुबाई जगन्नाथ शिर्के (रा. म्हसवे) यांनी 28/12/2005 रोजी जीवन अक्षय ही पॉलिसी एलआयसी एजंट अजय धर्मराज शिर्के याच्याकडे काढली होती. त्याचा त्या दरमहा 929 हप्ता भरत होत्या. या पॉलिसीला वारस म्हणून भाऊ प्रकाश श्रीपती मांढरे (रा. मांढरदेव) याचे नाव लावले होते. मात्र प्रकाश आणि अजय या दोघांनी संगनमताने रंगुबाई शिर्के यांचा बनावट मृत्यूचा दाखला तयार करून पॉलिसीची रक्कम 59000 मिळण्यास सप्टेंबर 2014 मध्ये मृत्यू दावा दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी मयत दाखवलेल्या रंगुबाई शिर्के या स्वत: वाई एलआयसी कार्यालयात हजर झाल्याने मोठी खळबळ माजली. त्यावेळी वारसांच्या बनावट कागदपत्रांचा उलगडा झाला. शाखा व्यवस्थापक प्रकाश जगन्नाथ चांभरे यांनी या प्रकरणी प्रकाश मांढरे आणि अजय शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.    
या प्रकरणी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या हे लक्षात आल्यावर सपोनि. महेंद्र निबाळकर यांना तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी प्रकाश आणि अजय यांच्या घरावर पाळत ठेवली होती. प्रकाश याला मांढरदेव येथून तर अजय याला म्हसवे येथून ताब्यात घेतले होते. त्यांना वाई न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: