Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मसूद अझरवरील बंदीत चीनची पुन्हा आडकाठी
ऐक्य समूह
Thursday, March 14, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यामध्ये पुन्हा एकदा आडकाठी घालण्याचे संकेत चीनने दिले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्यापूर्वी भारताने मसूद विरोधात भक्कम आणि स्वीकारार्ह पुरावे द्यावेत, चीनने म्हटले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेतील ‘पी-5’पैकी अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व नसलेल्या जर्मनीनेही पाठिंबा दिला आहे.
मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत उद्या (दि. 14) रोजी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन प्रस्ताव आणणार आहे. या विषयावर इतर सदस्य देशांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. सुरक्षा परिषदेत 27 फेब्रुवारी रोजी फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर उद्या सुरक्षा परिषदेत चर्चा होणार आहे. ही चर्चा होण्यापूर्वी या प्रस्तावाला विरोध करण्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वी कायमस्वरूपी सदस्य देशांनी आपला आक्षेप नोंदवला पाहिजे.
त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की,    मी पुन्हा सांगू इच्छितो की, चीन जबाबदारीने भूमिका पार पडताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीच्या चर्चेत सहभागी होणार आहे. या प्रकरणी सर्व सदस्य देशांकडे स्वीकारार्ह असतील आणि ज्याद्वारे समस्येवर तोडगा निघेल, असे पुरावे असावेत.
यापूर्वीही चीनने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये खोडा घातला आहे. गेली दहा वर्षे भारत यासाठी धडपडत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: