Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसचे महाराष्ट्रातील पाच उमेदवार जाहीर
ऐक्य समूह
Thursday, March 14, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: mn2
सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरातून उमेदवारी
5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 21 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश असून अपेक्षेप्रमाणे सोलापूर मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघातून नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील बारा नावे अंतिम केल्याची चर्चा होती. या बारापैकी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा बुधवारी रात्री करण्यात आली. यामध्ये नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विरोधात भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर गडचिरोलीमधून पुन्हा एकदा डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील पाच मतदारसंघ काँग्रेसकडे असून यातील दोन मतदारसंघांमधील उमेदवार आज जाहीर करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे माजी खासदार मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून आणि प्रिया दत्त यांना उत्तर-मध्य मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर मतदारसंघातून पुन्हा  रिंगणात उतरवले जाणार, हे निश्‍चित होते. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच सोलापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्याने तेथे तिरंगी लढत होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: