Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म’श्‍वर येथे राखीव वनातून चोरलेल्या शिकेकाईसह 34 लाखांचा मुद्देमाल जप्त
ऐक्य समूह
Friday, March 15, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: re1
5महाबळेश्‍वर, दि. 14 : अवैधरीत्या राखीव वनातून शिकेकाई गोळा करून तिची अवैधरीत्या वाहतूक करणार्‍या टोळीस अत्यंत शिफातीने सापळा रचून महाबळेश्‍वर वनखात्याने सुमारे 34 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान या मागे वन उत्पादने यांची खरेदी-विक्री करणारी मोठी टोळी असावी असा दाट संशय वनखात्याला येत असून त्या दृष्टीने तपास सहाय्यक वनसंरक्षक के. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्‍वरचे वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड करत आहेत.
हद्दीतील राखीव वनातून अवैधरीत्या शिकेकाई व अन्य वन उत्पादने गोळा करून तिची अवैधरीत्या वाहतूक महाबळेश्‍वर येथील प्रतापगड घाटातून केली जात असल्याची गुप्त खबर महाबळेश्‍वर वनखात्यास मिळाली. महाबळेश्‍वरचे वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी तातडीने त्यानुसार येथील महाड नाका येथे मंगळवारी रात्री 8.30 वाजता वनपाल एस. एम. शिंदे, वनरक्षक डी. बी. सोरट, ए. व्ही. पाटील, ए. डी. कुंभार, बी. टी. वडकर यांच्या मदतीने सापळा रचून नाकेबंदी केली असता तेथे वनखात्याला महिंद्र पिकअप वाहनामधून अवैधरीत्या शिकेकाईची वाहतूक अक्षय कारंडे, अमोल कारंडे तसेच जयंत चव्हाण हे करत असल्याचे निदर्शनास आले. तातडीने गाडीसह मुद्देमाल व संशयितांना  ताब्यात घेवून   तपास केला असता अक्षय कारंडे (वय-22), अमोल कारंडे (वय-27), दोघे रा.वाडा  कुंभरोशी (प्रतापगड पायथा) व वाहन चालक जयंत आनंदा चव्हाण (वय-32,) रा. पांडेवाडी, ता. वाई हे तिघे शिकेकाईची सुमारे 55 पोती घेवून वाई येथील व्यापार्‍याला विकण्यास चालले होते. वनाधिकार्‍यांनी तातडीने अक्षय कारंडे (वय-22), अमोल कारंडे (वय- 27), दोघे रा. वाडा  कुंभरोशी (प्रतापगड पायथा) व वाहन चालक जयंत आनंदा चव्हाण (वय-32,) रा. पांडेवाडी, ता. वाई या तिघांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41-1,2 (बी) अन्वये गुन्हा दाखल केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे तसेच मुद्देमाल 55 पोती  शिकेकाई, वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी महिंद्र पिकअप गाडी तसेच या गुन्ह्यात टेहळणीसाठी वापरली गेलेली अ‍ॅक्टिव्हा स्कूटर असा एकूण सुमारे 34 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. या छापा पथकामध्ये वनपाल एस. के. नाईक, एस. एम. शिंदे, वनरक्षक वनपाल एस. एम. शिंदे, वनरक्षक डी. बी. सोरट, ए. व्ही. पाटील, ए. डी. कुंभार, बी. टी. वडकर, आर. एन. गडदे, कु. व्ही. एस. घारगे, कु. जे. आर. घारगे यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक के. एस. कांबळे, महाबळेश्‍वरचे वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महाबळेश्‍वर एस. के. नाईक करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: