Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत उदयनराजे, सुप्रिया सुळे, तटकरे
ऐक्य समूह
Friday, March 15, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
नगरची उमेदवारी गुलदस्त्यात; मावळ, माढ्याचा तिढा कायम
5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने आज 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे(बारामती), श्री. छ. उदयनराजे भोसले (सातारा), धनंजय महाडिक (कोल्हापूर) यांच्याबरोबर सुनील तटकरे (रायगड) राजेश विटेकर (परभणी), राजेंद्र शिंगणे (बुलढाणा) आदींचा या यादीत समावेश आहे. मात्र, ज्यांच्यासाठी शरद पवार यांनी माढ्यातील आपली उमेदवारी मागे घेतली त्या पार्थ अजित पवार यांच्या नावाचा समावेश पहिल्या यादीत नाही. नगरचा उमेदवार कोण हेदेखील अद्याप गुलदस्त्यात आहे तर माढ्याचा तिढाही अजून सुटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नावे जाहीर करताना उर्वरित उमेदवारही येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली. मावळत्या लोकसभेत राष्ट्रवादीचे सहा खासदार होते. त्यापैकी बिहारमधून निवडून आलेल्या तारिक अन्वर यांनी पूर्वीच खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. उर्वरित पाचपैकी विजयसिंह मोहिते-पाटील यांचा अपवाद वगळता सुप्रिया सुळे (बारामती), उदयनराजे भोसले (सातारा), धनंजय महाडिक (कोल्हापूर) व मोहम्मद फैजल (लक्षद्वीप) या विद्यमान खासदारांचा पहिल्या यादीत समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (रायगड) यांचाही पहिल्या यादीत समावेश आहे.
बुलढाण्यातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना तर जळगावमधून माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीतून राजेश विटेकर, उत्तर-पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे, कल्याणमधून बाबाजी बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये आणि मित्रपक्षांमध्ये चार-पाच जागांबाबत चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संयुक्त सभा घेतल्या जातील. प्रचार कुठे आणि कसा करायचा याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
माढा, मावळ, नगर ‘वेटिंगवर’
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते; परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याने एकाच कुटुंबातील तीन-तीन उमेदवार नको म्हणून पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थ यांनी काल एकवीरा देवीचे दर्शन घेऊन प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवातही केली आहे. मात्र, त्यांच्या नावाची औपचारिक किंवा अधिकृत घोषणा आज झाली नाही. माढा मतदारसंघात पर्यायी उमेदवार कोण असणार, हेदेखील अजून गुलदस्त्यात आहे. सुजय विखे यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादामुळे नगरची जागा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. स्वतः शरद पवार यांनी काल नगर जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन आढावा घेतला होता. तेथून संग्राम जगताप यांचे नाव निश्‍चित झाल्याची चर्चा असली तरी राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नगरचा समावेश नाही.
राजू शेट्टींना हातकणंगलेत पाठिंबा
राष्ट्रवादीकडून खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी हातकणंगलेची एक जागा सोडण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी बुलढाणा, वर्धा, हातकणंगले या तीन जागांची मागणी केली होती. त्यापैकी बुलढाणा येथे राष्ट्रवादीने राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली आहे. आघाडीचा अंतिम निर्णय झाला नसला तरी राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पवारांनी कोणाचाही अपमान केला नाही
शरद पवार यांनी आपल्या वडिलांचा अपमान केला, या राधाकृष्ण विखे यांच्या आरोपाविषयी विचारले असता ते म्हणाले, शरद पवारांनी कुणाचाही अपमान केलेला नाही. 28 वर्षांपूर्वी काय घडले होते, असे त्यांना विचारण्यात आले होते. तेव्हा बाळासाहेब विखे-पाटील स्वतंत्र लढले होते. त्यांच्याविरोधात यशवंतराव गडाख हे विजयी झाले एवढेच शरद पवार यांनी सांगितल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नगरमध्ये प्रचार न करण्याची भूमिका घेतली असली तरी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मानणारे काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचा प्रचार करतील, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: