Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

विरोधी पक्षनेतेपदाबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील
ऐक्य समूह
Friday, March 15, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: mn3
नगरला कोणाच्याही प्रचाराला जाणार नाही : विखे-पाटील
5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अडचणीत आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आज प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आले. आपली बाजू पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार असून ते जो निर्णय देतील तो मान्य करू, असे सांगताना विरोधी पक्षनेतेपदाचा स्वतःहून राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्व. बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत  केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना नगरला कोणाच्याच प्रचाराला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगर लोकसभा मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली आहे. विरोधी पक्षनेत्यांचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली असून राधाकृष्ण विखे हेदेखील अडचणीत आले आहेत. ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा कालपासून सुरू होती. मात्र, आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करताना आपण राजीनामा दिलेला नाही आणि देणारही नसल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये जाण्याचा सुजयचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्याला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठींना भेटून आपण आपली बाजू मांडणार असून ते जो निर्णय देतील, तो मान्य करू, असे विखे-पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या वडिलांबाबत वक्तव्य केले. आपल्या आजोबांबाबत पवार बोलल्याने  नाराज झालेल्या सुजयने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. पवार यांच्या मनात विखे कुटुंबाबाबत द्वेष आहे. एका हयात नसलेल्या व्यक्तीबाबत बोलणे चुकीचे आहे. पवार यांनी आघाडी धर्म पाळला नाही, असा आरोप विखे यांनी केला. पवारांच्या वक्तव्यामुळे दु:ख झाले. त्यांनी जुने वाद आता विनाकारण काढण्याचा काहीही संबंध नव्हता. यातून त्यांच्या मनातील द्वेष स्पष्ट होतो. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार नगरमध्ये करणार नसल्याचे स्पष्ट केले.
नगरच्या जागेची मागणी रास्त होती
औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेच्या बाबतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न होता. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात त्यासाठी नगरच्या जागेची मागणी केली होती. राष्ट्रवादीनेही काही जागा बदलून मागितल्या होत्या. मागच्या तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा येथे पराभव झाला आहे. ती जागा काँग्रेस जिंकू शकते, म्हणूनच आम्ही त्याची मागणी करत होतो, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. मुलासाठी संघर्ष निर्माण केल्याचा आरोप चुकीचा आहे. सुजयने त्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी होती. गालबोट लागेल, असं विधान माझ्याकडून होणार नाही, याची मी काळजी घेतली. आघाडी धर्म पाळला. आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का?
काँग्रेसने विखे कुटुंबाला खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे विखेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली होती. याबाबत विचारले असता, मला जे सांगायचं आहे ते हायकमांडला सांगेन. बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का? मी त्यांना सांगण्यास बांधील नाही. बाळासाहेब थोरात यांच्याकडे कपबशी, नारळ, रोलर कुठून आले हे मला माहिती आहे. त्यांनी मला पक्षनिष्ठा सांगू नये, असे उत्तर विखे-पाटील यांनी दिले. विखे-पाटील यांच्याबाबत काँग्रेस हायकमांड आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विखेंनी आघाडी धर्माबद्दल बोलू
दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना, ज्यांच्या मुलाने आघाडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. राजीव गांधींनी बाळासाहेब विखेंना पाडा, असा आदेश दिला होता. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ती जबाबदारी शरद पवारांनी पाळली होती, याची आठवण आव्हाड यांनी करून दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: