Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सीएसटीजवळ पादचारी पूल कोसळला
ऐक्य समूह
Friday, March 15, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: mn2
पाच नागरिकांचा मृत्यू; तीस जण जखमी
5मुंबई,  दि. 14 (वृत्तसंस्था) : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या पादचारी पुलाचा सिमेंटचा भाग गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास कोसळून येथे पाच जण ठार तर अंदाजे 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये तातडीने दाखल करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उत्तरेकडील भागाला अंजुमन इस्लाम हायस्कूलजवळ बीटी लेनला जोडणारा पादचारी पूल सायंकाळी 7.30 च्या सुमारास कोसळला. पुलावर दहा ते बारा लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या पुलावरील काँक्रिटचा भाग पूर्णपणे कोसळल्याने पुलाचा सांगाडा राहिला आहे. हा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने बचाव कार्यात गुंतलेल्या पथकांनी तेथील गर्दी कमी केली. ही गर्दी अन्य स्थानकांकडे वळवण्यात आली.
या दुर्घटनेमुळे मुंबईच्या बाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदत व बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे एक पथकही तेथे धाडण्यात आले. या पथकानेही मदत व बचावकार्यात भाग घेतला.   
पुलाचा भाग डॉ. डी. एन. रस्त्यावर कोसळल्याने जे. जे. रुग्णालय परिसरातील उड्डाण पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. पुलाच्या ढिगार्‍याखाली दहा ते बारा जण दबले होते. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने तातडीने मदत व बचावकार्य राबवून ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. रात्री उशिरा घटनास्थळी बचाव कार्य संपुष्टात आल्यानंतर एनडीआरएफचे पथक माघारी फिरले. काही वर्षांपूर्वी अंधेरी येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून दोन जण ठार झाले होते. त्यानंतर रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल कोसळल्याची ही दुसरी घटना आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: