Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खा.श्री.छ. उदयनराजे भोसले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
ऐक्य समूह
Tuesday, April 02, 2019 AT 11:32 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 1 : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले उद्या मंगळवार दि. 2 रोजी सकाळी 11 वाजता सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या आमदारांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून श्री. छ. उदयनराजे भोसले यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व आमदार व काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. जयकुमार गोरे यांनी उदयनराजेंना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा मानस व्यक्त करत त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच उदयनराजेंनी बैठका घेण्यास सुरुवात केली होती. पाटण आणि कराड तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करत राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे यांच्या प्रचाराचे नियोजन केले आहे.  
उद्या मंगळवार दि. 2 रोजी  सकाळी  8 वाजता गांधी मैदान येथून रॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ.आनंदराव पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने,       सातारा नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्या-साठी खा. शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वेळ घेण्यापेक्षा खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, अशी माहिती माने यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: