Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुण्यात शस्त्रास्त्र, स्फोटकांचा मोठा साठा आढळला; एकाला अटक
ऐक्य समूह
Thursday, April 04, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 3  : पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. राजाराम किसन अभंग (वय 60, रा. अभंगवस्ती, पिंपळवाडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा आहे. यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून पत्नीला जीवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता. बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पिंपळवाडी येथील राजाराम अभंग याच्याकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अभंग याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना इलेक्ट्रिक गन, पाइप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला. अभंग हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा असून यापूर्वी त्याने 2003 मध्ये त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात काही लोक जखमी झाले होते. या प्रकरणी तो तीन वर्षे येरवडा कारागृहात कैदेत होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी अभंग याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: