Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उसाच्या हप्त्यावर चोरट्यांचा डल्ला
ऐक्य समूह
Saturday, April 06, 2019 AT 11:44 AM (IST)
Tags: lo1
77 हजारांची रोकड लंपास; उदयनराजेंच्या रॅली दिवशी घटना
5सातारा, दि. 5 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे सातारा लोकसभा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या रॅली दिवशी एका सर्वसामान्य शेतकर्‍याच्या उसाच्या हप्त्यावर डल्ला मारत पिशवी ठेवलेली 77 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात आज दाखल झाली.
मंगळवार, दि. 2 एप्रिल रोजी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गांधी मैदानातून विराट रॅली काढण्यात आली होती. सुमारे 10 हजार पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. रॅलीसाठी जमलेल्या गर्दीचा पुरेपूर फायदा घेत एका चोरट्यांच्या टोळीने अनेकांच्या सोन्याच्या चेन, रोख रकमेवर डल्ला मारून सुमारे 42 तोळे सोन्यासह 23 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याच्या तक्रारी शाहूपुरी आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र ते तपासाला सहकार्य करीत नसल्याचे समजते.
सर्जापूर, ता. वाई येथील एका ऊस उत्पादक   शेतकर्‍याच्या खात्यावर 77 हजार रुपयांचे ऊस बिल जमा झाले होते. जमा झालेली ऊस बिलाची रक्कम गावातील बँकेतून काढून ते सातारा येथील बँकेमध्ये टाकण्यासाठी दि. 2 एप्रिल रोजी सातारा येथे आले होते. बसस्थानकावरून पोवई नाक्यावर आल्यानंतर रिक्षाचालकाने रॅलीच्या गर्दीचे कारण सांगून पोवई नाक्यावर उतरण्यास भाग पाडले. संबंधित शेतकरी रिक्षातून उतरून रॅली बघत थांबला होता. काही वेळाने
तो एका बँकेत 77 हजार रुपये भरण्यासाठी गेला असता अज्ञात
चोरट्यांनी बॅग कापून त्यातील 77 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात
दिली आहे.
तपास पथक बीडमध्ये दाखल
उदयनराजेंच्या रॅलीमध्ये अज्ञात चोरट्यांनी 42 तोळे सोन्यासह सुमारे 1 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले. मात्र अद्यापही समाधानकारक माहिती मिळत नसल्याने मिळालेल्या माहितीवरून तपास पथक बीडकडे रवाना करण्यात आले होते. पथक बीडमध्ये दाखल झाले असून संबंधित संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: