Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रालोआ काठावरच्या बहुमतासह सत्ता राखणार
ऐक्य समूह
Wednesday, April 10, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: na2
मतदानपूर्व जनमत चाचण्यांचा अंदाज
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिल रोजी होत असून मतदानपूर्व चार जनमत चाचण्यांच्या अंदाजानुसार काठावरचे बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार पुन्हा सत्तेत येईल. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार रालोआला 543 पैकी सरासरी 273 जागा मिळतील, यूपीएला 115 ते 149 तर अन्य पक्षांना 115 ते 160 जागा मिळतील.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपप्रणीत रालोआला तब्बल 330 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. गेल्या तीन दशकांमधील एवढे प्रचंड बहुमत प्रथमच एका आघाडीला मिळाले होते. त्या तुलनेत यंदा रालोआच्या जागा कमी होतील. मात्र, रालोआ काठावरचे बहुमत मिळवून सत्ता कायम राखेल, असा अंदाज या जनमत चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे. चार सर्वेक्षणांच्या अंदाजानुसार रालोआला कमीत कमी 263 आणि जास्तीत जास्त 283 जागा मिळू शकतील. त्यात एकट्या भाजपला 228 जागांपर्यंत मजल मारता येईल. भाजपच्या 54 जागा घटणार आहेत, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ले केल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारची लोकप्रियता वाढल्याचे सर्वच सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे. सध्याच्या भारतात प्रथमच राष्ट्रीय सुरक्षेचा विषय रोजगार आणि इतर मुद्द्यांवर भारी पडला आहे, असे ‘सी-व्होटर’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीयांचे सरासरी जीवनमान, आर्थिक हितसंबंध आणि रोजगार या मुद्द्यांबाबत आपण काँग्रेसपेक्षा वेगळे आहोत, हे भाजपला सिद्ध करता आले नसले तरी दहशतवादावर नियंत्रण आणि दहशतवादाविरोधात कठोर कारवाई या मुद्द्यांवर भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे.
 या चार सर्वेक्षणांनुसार यूपीएला जास्तीत जास्त 141 ते 149 जागा मिळण्याची शक्यता असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची स्थिती काहीशी सुधारेल. काँग्रेस 88 जागांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील सप-बसप आघाडी आणि अन्य प्रादेशिक पक्षांना मिळून 129 जागा मिळतील, असा अंदाजही या सर्वेक्षणातून समोर
आला आहे.
सी-व्होटरच्या मतदानपूर्व जनमत चाचण्यांनुसार रालोआला 267, यूपीएला 142 व इतर पक्षांना 134 जागा मिळतील. इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या सर्वेक्षणात रालोआला 275, यूपीएला 147 आणि अन्य पक्षांना 121 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सीएसडीएस-लोकनीतीच्या सर्वेक्षणात रालोआला 263 ते 282, यूपीएला 115 ते 135, इतर पक्षांना 130 ते 160, टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्वेक्षणात रालोआला 279, यूपीएला 149 आणि इतर पक्षांना 115 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: