Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या
ऐक्य समूह
Wednesday, April 10, 2019 AT 11:32 AM (IST)
Tags: na1
लोकसभा निवडणुकीत उद्या पहिला पेपर
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 91 मतदारसंघांमध्ये गुरुवारी (11 एप्रिल) मतदान होणार असून तेथील जाहीर प्रचार आज सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आला. त्यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी होणार्‍या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह 116 उमेदवारांचे भवितव्य 1 कोटी 30 लाख मतदार ठरवणार आहेत.
लोकसभेच्या 543 जागांपैकी 20 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 91 जागांसाठी गुरुवारी मतदान होईल. बहुतेक ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होईल.
ईशान्येकडील आणि नक्षलग्रस्त राज्यांमधील काही जागांसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5, काही ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 4 आणि काही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे मतदानाचा कालावधी मर्यादित ठेवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या वर्धा, रामटेक, नागपूर,भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या सात लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. तेथील प्रचाराची रणधुमाळी आज संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी नेत्यांच्या प्रचार सभांमुळे येथील वातावरण ढवळून निघाले होते. विदर्भातील सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी तर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासमोर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या सुरेश धानोरकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.
राज्यात 14 हजार मतदान केंद्रे सज्ज
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 14 हजार 919 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून मतदानासाठी 73 हजार 837 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे. ज्या मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर दोन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 26 हजार ईव्हीएम, 18 हजार कंट्रोल युनिटस् आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहे. ऐन वेळी मतदान यंत्रात बिघाड होण्याची शक्यता गृहीत धरून जवळपास सर्व मतदान केंद्रांवर राखीव यंत्रे देण्यात आली आहेत. सात मतदारसंघांत 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: