Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनास स्थगिती
ऐक्य समूह
Thursday, April 11, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाचा आदेश ‘नमो टीव्ही’ या वाहिनीलादेखील लागू होतो, असे आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे ही वाहिनीही निवडणूक कालावधीत बंद राहणार आहे. मोदींवरील बायोपिकला सेन्सॉर बोर्डाने ‘यू’ प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन उद्या, दि. 11 रोजी संपूर्ण देशभर होणार होते. त्याच्या एक दिवस आधीच हे प्रदर्शन निवडणूक आयोगाने रोखले आहे.
या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती.   
या चित्रपटाला अजून सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्याचे प्रदर्शन रोखण्याचा आदेश देणे घाईचे ठरेल. त्याचबरोबर हा चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित झाला तरी या संदर्भात तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोग हाच योग्य मंच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
त्यानंतर आज निवडणूक आयोगाने या चित्रपटाचे प्रदर्शन लोकसभा निवडणूक कालावधीत स्थगित केले आहे. प्रमाणित सामग्रीशी संबंधित असलेले कोणतेही पोस्टर किंवा प्रसिद्धी साहित्य कोणत्याही उमेदावाराच्या प्रचारार्थ वापरण्यात येण्याची शक्यता असेल आणि त्यात संबंधित उमेदवाराचे चित्र रेखाटले असेल आणि त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात त्याचा निवडणूक प्रचारात संबंधित उमेदवाराला लाभ होणार असेल तर असे साहित्य आचारसंहिता सुरू असेपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रदर्शित केले जाऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचा हाच आदेश ‘नमो टीव्ही’ या वाहिनीला लागू होतो, असे आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे निवडणूक कालावधीत या वाहिनीवरही बंदी आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: