Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बालाकोटमधील रहस्य अजूनही दडपलेले
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: na2
5जाबा, दि. 11 (वृत्तसंस्था) : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोटमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर तब्बल 43 दिवसांनी पाकिस्तानी लष्कराने बुधवारी  आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळी नेले. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला, तेथील परिस्थिती पाकिस्तानने पत्रकारांना दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या मदरशाचे हवाई हल्ल्यात नुकसान झाले, तो मदरसा या पत्रकरांना दाखवण्यात आला नाही. उलट पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्‍यांना जाबा टेकडीवरील दुसर्‍या मदरशात नेण्यात आले. त्यावेळी तिथे 100 ते 150 मुले शिक्षण घेत होती. 26 फेब्रुवारीला भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आपले काहीही नुकसान झाले नाही, हे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये ‘जैश’चा तळ उद्ध्वस्त झाला नाही तर घटनास्थळी पत्रकारांना घेऊन जायला पाकिस्तानला दीड महिना का लागला? पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाबा टेकडीवरील तो साधा मदरसा होता, तेथे धार्मिक शिक्षण दिले जाते तर मदरशाच्या भेटीच्या वेळी इतका लष्करी फौजफाटा तिथे का होता? एअर स्ट्राइकच्या दुसर्‍याच दिवशी पत्रकारांना घटनास्थळी का जाऊ दिले नाही? एअर स्ट्राइकनंतर नवव्या दिवशीसुद्धा रॉयटर्सच्या पत्रकारांना घटनास्थळी जाण्यापासून का रोखण्यात आले? नुकसान झालेच नाही तर पाकिस्तान इतके दिवस काय लपवत होता? या प्रश्‍नांची उत्तरे पाकिस्तानकडे आहेत का? भारताच्या एअर स्ट्राइकबद्दल संशय घेणारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे या विषयाच्या मुळाशी जाणार आहेत का, असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
पाकिस्तानने ज्या पत्रकारांना घटनास्थळी नेले, त्यांना स्थानिकांशी जास्त वेळ बोलू नका, असे निर्देश दिले होते. बीबीसी उर्दूच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, पत्रकारांना येथे आणण्यास इतका उशीर का केला, असा प्रश्‍न पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर यांना विचारला  असता, त्यांनी वेळ मारून नेणारे उत्तर दिले. घटना वेगाने घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती. त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकार स्थानिकांशी बोलत असताना पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांचे अत्यंत बारीक लक्ष होते, असे बीबीसीच्या पत्रकारनेच म्हटले आहे.
विदेशी पत्रकार हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर दीड तास पायपीट करून जाबा टेकडीवर पोहोचले. मुख्य नागरी वस्तीपासून हा भाग खूप दूर असल्यामुळे दहशतवादी प्रशिक्षणासाठी ही अत्यंत मोक्याची जागा आहे. त्यामुळे तिथे ‘जैश’चा दहशतवादी तळ होता, हा भारताचा दावा शंभर टक्के खरा आहे. भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये लक्ष्यावर अचूक प्रहार करून आपली क्षमता दाखवून दिली. एअर स्ट्राइकवर संशय घेणार्‍यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, असे मत व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: