Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विदर्भात सात मतदारसंघांमध्ये 56 टक्के मतदान
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 10:55 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भामधील सात मतदारसंघांमध्ये आज सरासरी अंदाजे 56 टक्के मतदान झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह 116 उमेदवारांचे भवितव्य आज मतदानयंत्रात बंद झाले.
मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास आठ टक्के मतदान कमी झाले आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी निवडणूक कर्मचार्‍यांवर केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. या व्यतिरिक्त अन्यत्र शांततेत मतदान झाल्याचे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी विदर्भातल्या वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांत मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. रणरणत्या उणामुळे सुरुवातीला संथगतीने मतदान होत होते. दुपारी तीनपर्यंत सुमारे 45 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी मतदानाला वेग आला. मतदानाची वेळ सायंकाळी सहापर्यंत होती. सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या लोकांना नियमाप्रमाणे संधी दिली गेल्याने अनेक ठिकाणी प्रत्यक्षात रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 55.97 टक्के मतदान झाले होते. या सात मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत सरासरी 64.15 टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी आल्यानंतर मतदानाची आकडेवारी वाढणार आहे. नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात अत्यंत चुरशीची लढत असून तेथे 2014 पेक्षाही अधिक मतदान झाल्याने वाढलेल्या मतदानाचा नेमका कोणाला फायदा होणार याबाबतची उत्कंठता वाढली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दोन घटनांचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज एकूण 14 हजार 919 मतदान केंद्रावर मतदान झाले. यातील 98 ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये तर 164 ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान थांबले; परंतु अतिरिक्त यंत्रे उपलब्ध करून देण्यात आल्याने दहा-पंधरा मिनिटात पुन्हा मतदान सुरू झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. गडचिरोली येथे मतदान कर्मचार्‍यांवर झालेल्या गावठी बॉम्बहल्ल्यात दोन जवान जखमी झाले. त्यांना हेलिकॉप्टरने तातडीने तेथून उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
चार केंद्रांवर मतदानच नाही
गडचिरोली जिल्ह्यातील आहिरी विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रांवर मतदान कर्मचारी पोहोचू न शकल्याने तेथे आज मतदानच होऊ शकले नाही. तेथे फेरमतदान घेतले जाणार आहे.
औसाच्या सभेचा अहवाल पाठवला
सैनिकी कारवाई व शहिदांच्या नावाचा वा छायाचित्रांचा निवडणूक प्रचारात वापर करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर जिल्ह्यातील औसा येथील प्रचार सभेत नवमतदारांनी आपले पाहिले मत शाहिदाना समर्पित करावे, असे आवाहन केले होते. याबाबत काँग्रेसने तक्रारही केली होती. या सभेबाबतचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
सात लोकसभा मतदारसंघातील साडेपाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची प्राथमिक आकडेवारी (कंसातील आकडे 2014 च्या मतदानाचे) : वर्धा 55.36 टक्के (64.79), रामटेक 51.72 टक्के (62.64), नागपूर 53.13 टक्के (57.12), भंडारा-गोंदिया 60.50 टक्के (72.31), गडचिरोली-चिमूर 61.33 टक्के (70.4), चंद्रपूर 55.97 टक्के (63.29), यवतमाळ-वाशीम 53.78 टक्के (58.67).

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: