Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाक वैमानिकांना राफेल उड्डाणाचे प्रशिक्षण?
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या हवाई दलाच्या वैमानिकांना फ्रान्सने राफेल विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिल्याच्या वृत्ताचा फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर जिग्लर यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. ही फेक न्यूज आहे, असे जिग्लर यांनी सांगितले.
अमेरिकेच्या एका संकेतस्थळाने दावा केला होता की, फ्रान्सने कतारला राफेल विमाने विकल्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये फ्रान्सने पाकिस्तानी हवाई दलाच्या वैमानिकांना या विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले होते. पाकिस्तानी वैमानिक म्हणजे ‘एक्स्चेंज ऑफिसर्स’ होते, असा दावा या संकेतस्थळाने केला होता.
पाकिस्तानचे पश्‍चिम आशियातील अनेक देशांशी सैन्य संबंध आहेत. अदलाबदल कार्यक्रमांतर्गत त्यांचे सैन्य अधिकारी कतार, जॉर्डन, सौदी आदी देशांमध्ये जातात.   या देशांचे अधिकारीही पाकिस्तानात येतात. संकेतस्थळाच्या दाव्यानुसार कतारला मे 2015 मध्ये 6.3 अब्ज युरोमध्ये 24 राफेल विमाने खरेदी करारानुसार विमाने मिळाली होती. दरम्यान, ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने त्यावर गंभीर  चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेच्या संकेतस्थळाने केलेला दावा भारतासाठी चिंताजनक असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक रचित सेठ यांनी व्यक्त केले होते. विशेष म्हणजे फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून भारतात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, ते खोटे वृत्त असल्याचे स्पष्टीकरण फ्रान्सच्या दूतावासाने केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: