Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विरोधकांचा पुन्हा ईव्हीएम राग सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
ऐक्य समूह
Monday, April 15, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) मुद्द्यावर रविवारी विरोधी पक्षांची नवी दिल्ली येथे बैठक पार पाडली. यावेळी बैठकीत ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित झाला. 50 टक्के पेपर ट्रेलची ईव्हीएम सोबत पडताळणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे यावेळी विरोधी पक्षांनी सांगितले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन ईव्हीएम बरोबर छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला.
21 राजकीय पक्षांनी 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. व्हीव्हीपॅट प्रणालीमुळे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याची माहिती मतदाराला समजते. व्हीव्हीपॅटवर डिसप्ले सात सेकंदांऐवजी फक्त तीन सेकंदांसाठी दिसतो, असे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवडणूक आयोग आमच्या पारदर्शकतेच्या मागणीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे सिंघवी म्हणाले. व्हीव्हीपॅट स्लीप मोजत बसलो तर आम्हाला पाच पेक्षा जास्त दिवस लागतील, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यावर आम्ही मत मोजणीसाठी कर्मचारी संख्या वाढवा तुम्हाला पाच दिवस लागणार नाहीत, असे त्यांना सांगितल्याचे सिंघवी म्हणाले.
मी इंजिनीयर, मलाही कळतं: केजरीवाल
ईव्हीएम मशीनमध्ये गडबड नाही. पण त्यात फेरफार करण्यात आला आहे. केवळ भाजपलाच मतदान जाईल, अशा पद्धतीनेच ही मशीन तयार करण्यात आल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ज्या ज्या मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जातोय, त्या त्या मशीनमधील मते केवळ भाजपलाच का जातात, असा सवालही त्यांनी केला. मी स्वत: इंजिनीयर आहे. त्यामुळे मला बर्‍यापैकी कळते. या मशीनमध्ये काही तरी लोचा आहे, असे सांगत भाजपवाले स्वत:लामर्दही समजतात आणि चोरीही करतात, अशी टीकाही त्यांनी केली. 
मतदार यादीतून 25 लाख नावे गायब : चंद्राबाबू
तर चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगणात तंत्रज्ञानाचा वापर करुन मतदार यादीतून 25 लाख मतदारांची नावेच गायब करण्यात आल्याचा आरोप केला. मतदानाची संख्या आणि मतदानासाठी आलेल्या मतदारांची संख्या यात तफावत कशी असू शकते, असा सवाल त्यांनी केला.
फक्त 12 तासांसाठी मशीन द्या
यावेळी या सर्व नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. आमचा मतदारांवर विश्‍वास आहे. पण मशीनवर नाही, असे सांगत 12 ते 24 तासांसाठी आम्हाला ईव्हीएम मशीन द्या. त्यात फेरफार कसा केला जातो, हे आम्ही निवडणूक आयोगाला दाखवून देऊ. या प्रकरणी आम्ही लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: