Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राजकीय लाभासाठी खोटे बोलू नका : उत्पल पर्रिकर
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: na2
राफेल प्रकरणी शरद पवारांच्या वक्तव्यावर आक्षेप
5पणजी, दि. 15 (वृत्तसंस्था) : फ्रान्सबरोबर झालेल्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी कराराशी सहमत नसल्यानेच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी आक्षेप घेतला आहे. राजकीय फायद्यासाठी माझ्या वडिलांच्या नावाने खोटी माहिती पसरवू नका. तुमचे वक्तव्य असंवेदनशील आहे. तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असे वागणे अपेक्षित नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.
उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांच्या नावे पत्र लिहिले आहे. माझ्या वडिलांच्या नावाने खोटे बोलून राजकीय लाभ उठविण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे. तुम्ही असे वागणं बंद करावे, असे आवाहन करतानाच शरद पवार यांच्या विधानामुळे कुटुंब दुखावले गेल्याचे उत्पल यांनी म्हटले आहे. माझे वडील कर्करोगाशी झुंज देत असताना काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या नावाने खोटी माहिती देत राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला माझ्या वडिलांनी उत्तरही दिले होते. आज माझे वडील हयात नाहीत तरीही त्यांच्या नावावर चुकीची माहिती खपवून राजकारण केले जात आहे. हा राजकारणातील खालची पातळी गाठण्याचा प्रकार आहे. ज्येष्ठ नेते म्हणून तुमच्याबद्दल आदर आहे. त्यामुळेच तुमच्याकडून अशा विधानाची लोकांना अपेक्षा नव्हती, असंही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
माझे वडील प्रामाणिक होते. दिल्लीत असो की गोव्यात, त्यांनी नेहमी देशासाठीच काम केले.
संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यात राफेल करार हासुद्धा महत्त्वाचा भाग असून राफेल करार प्रक्रियेतील ते महत्त्वाचा हिस्सा होते. लोकांच्या प्रेमाखातरच
ते गोव्यात परतले. लोकनेते असल्यामुळे त्यांनी गोव्यात येऊन
शेवटच्या श्‍वासापर्यंत लोकांच्या हितासाठी काम केले. राफेल
करार मंजूर नव्हता म्हणून ते गोव्यात परतले, असे म्हणणे हा त्यांचा आणि गोव्यातील जनतेचा अपमान आहे. माजी संरक्षण मंत्री म्हणून या गोष्टीचे महत्त्व तुम्ही जाणून असाल, अशी आशा करतो, असे उत्पल पर्रिकर यांनी नमूद केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: