Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
योगी, मायावती, मनेका गांधी, आझम खान यांना प्रचारबंदी
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 15 (वृत्तसंस्था) : धर्माच्या नावावर मते मागणे, मतांसाठी धमकावणे आणि महिला उमेदवाराबात अश्‍लाघ्य वक्तव्य करणे, या कारणांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपच्या सर्वेसर्वा मायावती, केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लागू केली आहे. योगी आणि आझम खान यांच्यावर तीन दिवसांची तर मायावती व मनेका गांधी यांच्यावर दोन दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.
बसप प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जातीय आणि धार्मिक   आधारावर मते मागण्याचा प्रकार भोवला आहे. निवडणूक आयोगाने मायवती यांना दोन दिवस तर योगींना तीन दिवस निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. या काळात हे दोन्ही नेते कोणताही रोड शो करू शकणार नाहीत. त्यांना प्रचार सभाही घेता येणार नाहीत अथवा सोशल मीडियासह कोणत्याही प्रकारच्या माध्यमांमधून मुलाखती, विधाने, टीकाटिप्पणी करता येणार नाही. 16 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. मायावतींवरील बंदी 48 तासांची तर योगींवरील बंदी 72 तासांची आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार योगी आदित्यनाथ 16, 17 आणि 18 एप्रिल रोजी तर मायावती 16 आणि 17 एप्रिल रोजी प्रचार करू शकणार नाहीत. सप नेते आझम खान आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांच्यावरही निवडणूक प्रचारास बंदी घालण्यात आली आहे. आझम खान यांच्यावर 72 तासांची प्रचारबंदी आहे तर मनेका गांधी यांना 48 तासांची प्रचार बंदी करण्यात आली आहे.
मायावती यांनी उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये निवडणूक प्रचार सभेत मुस्लिम समुदायाला सप-बसप महाआघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. योगी आदित्यनाथ यांनीही धर्माच्या आधारे मते मागितली होती. विरोधकांना ‘अली’ आवडतो तर आम्हाला ‘बजरंगबली’ आवडतो, असे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून निवडणूक आयोगानं खुलासा मागत त्यांना फटकारले होते. मनेका गांधी यांनी मुस्लिम समाजाला मते देण्यासाठी धमकावले होते तर आझम खान यांनी भाजप उमेदवार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्याबाबत प्रचार सभेत अश्‍लील वक्तव्य केले होते.
निवडणूक आयोगावर ताशेरे
दरम्यान, निवडणूक प्रचारात जाती-धर्माच्या आधारे मते मागणार्‍या नेत्यांवर कारवाई न केल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आज भारत निवडणूक आयोगाला फटकारले. तुमच्या नोटिशीला मायावतींनी उत्तर दिले नाही. मग, तुम्ही काय केले, असा प्रश्‍न न्यायालयाने विचारला. या प्रकरणी मंगळवारी होणार्‍या सुनावणीला निवडणूक आयोगाच्या मुख्य प्रतिनिधींनी हजर राहावे, असा आदेशही न्यायालयाने दिला. दरम्यान, ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट आधी पाहा आणि मग, त्यावर बंदीबाबतचा निर्णय घ्या, असेही निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: