Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भुईंजचे आयएफएस अधिकारी राजेश स्वामी यांचे केनियातून सपत्निक मतदान
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: re4
5भुईंज, दि. 15 : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 12 दिवस आधीच मतदान करून आयएफएस अधिकारी तथा केनियतील भारताचे उपउच्चायुक्त राजेश स्वामी व त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी स्वामी हे दोघे या मतदारसंघात मतदान करणारे पहिले मतदार ठरले आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23 रोजी मतदान होणार आहे. परदेशातील भारतीय दुतावासात कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांना पोस्टल मतदान करण्याची सुविधा असते. त्याकरिता प्रत्येक दुतावसात एका मतदान अधिकार्‍याची नियुक्ती केलेली असते. मात्र परदेशस्थित अधिकार्‍यांना त्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्याप्रमाणे मूळ भुईंज येथील स्वामी यांनी केनियात ती केली होती. शुक्रवार, दि. 12 रोजी त्यांना मतपत्रिका उबलब्ध करून देण्यात आल्या. त्यानुसार स्वामी दाम्पत्याने मतदान करून त्या मतपत्रिका सातारा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे पाठवल्या. परदेशात खासगी उद्योग, नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या व्यक्तींना अद्याप पोस्टल मतदानाचा अधिकार नाही. मात्र, तो परदेशातील भारतीय दुतावसात कार्यरत असणार्‍यांना आहे. या अधिकार्‍यांनी स्वतःहून आपल्या मतदारसंघाचा उल्लेख करून नोंदणी करणे बंधनकारक आहे. स्वामी मतदानाचे महत्त्व जाणतात आणि या जाणिवेतूनच त्यांनी केनियाची राजधानी नैरोबी येथून स्वतःहून नोंदणी करत सपत्निक मतदान केले. त्यामुळे थेट परदेशातून 12 दिवस आधीच मतदान केलेले राजेश स्वामी व सौ. संजीवनी स्वामी या मतदारसंघात मतदान करणारे पहिले मतदार ठरले आहेत. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते अत्यंत डोळसपणे करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागरूकतेने व स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरुन मतदान करावे, असे आवाहन स्वामी दाम्पत्याने केले आहे. दरम्यान, राजेश स्वामी केनियात मतदान केल्यानंतर दुसर्‍या दिवशी भुईंज येथे आले आहे. त्यांना दि. 19 रोजीच केनियाला परतायचे आहे. त्यामुळे त्यांना तेथून मतदान करावे लागले आणि त्यामुळेच स्वामी दाम्पत्य सातारा मतदारसंघात मतदान करणारे पहिले दोघे मतदार ठरले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: