Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुष्काळी माणच्या दोन युवकांनी राजस्थानमध्ये उभारला 202 कोटींचा प्रोजेक्ट...
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re1
प चार हजारांवर युवकांना मिळणार रोजगार
प माण तालुक्यातही प्रोजेक्ट उभारण्याचा निर्धार
5बिजवडी, दि. 15 : माण तालुक्यातील टाकेवाडी गावचे युवा उद्योजक संदीप घोरपडे व हवालदारवाडी येथील उद्योजक धनाजीराव सावंत या दोन युवकांनी दुष्काळी माण तालुक्यातील प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जावून काबाडकष्ट करत आज उद्योगीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या कार्याचा झेंडा त्यांनी राज्याबरोबरच राजस्थानमध्ये रोवत 450 एकरात 202 कोटी रूपयांचा मोठा प्रोजेक्ट उभारला आहे. येत्या वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण होत आहे. या प्रोजेक्टद्वारे आपल्या दुष्काळी तालुक्यांबरोबरच इतर ठिकाणच्या चार हजारांवर युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिला जाणार आहे.
 श्रावणी सोलर अँड स्मिता ग्रुप ऑफ कंपनीद्वारे राजस्थान (भिलवाडा) येथे संदीप घोरपडे व धनाजी सावंत यांनी भागीदारीत 202 कोटी रूपयांचा 450 एकरात सोलर प्लेट प्रॉडक्शन व सोलर पार्क हा प्रोजेक्ट उभारला आहे. त्या ठिकाणी स्मार्ट सिटी होणार असून या प्रोजेक्टमध्ये सध्या 250 कामगार काम करत आहेत. सोलर प्लेट इतर देशातही एक्स्पोर्ट करता येणार आहेत. संदीप घोरपडे श्रावणी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे राज्यभर सामाजिक कार्य करत आहेत. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करत आहेत. गोरगरीब, दीन दलित, अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. विविध खेळातील गुणवान खेळाडूंना दत्तक घेत त्यांना राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. पुणे, मुंबईत सोलर कंपनीद्वारे  आपल्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव विविध पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. धनाजीराव सावंत यांनी रंग कामगार ठेकेदार संघटनेतून शेकडो युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. एशियन पेंट्स कंपनीने त्यांचा देशात तसेच दुबईमध्ये अनेकदा गौरव केला आहे. दुष्काळी भागातल्या या युवकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उद्योगीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. राजस्थानसारखा प्रोजेक्ट आपल्या मायभूमीत उभारण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्या माध्यमातून माण-खटावमधील युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: