Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुसर्‍या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: mn2
अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
5मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात गुरुवारी (दि. 18 एप्रिल) राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून तेथील प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी समाप्त होईल. या दहा मतदारसंघांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (नांदेड), माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (सोलापूर) आदी दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये 11 एप्रिल रोजी मतदान झाले. आता दुसर्‍या टप्प्यात 18 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर या दहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपचे प्रतापराव पाटील-चिखलीकर यांचे आव्हान आहे. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी हा गड राखला होता. चव्हाण आता पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले असून त्यांच्यासमोर शिवसेनेच्या प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
दहा लोकसभा मतदारसंघांपैकी सोलापूरमधील तिहेरी लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना, भाजपने लिंगायत समाजाचे जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे       
तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथील लढत अतिशय रंगतदार झाली आहे. बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनावणे यांना रिंगणात उतरवले आहे. सोनावणे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. प्रीतम मुंडे यांची ही निवडणूक त्यांच्या भगिनी आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने त्याही मतदारसंघात तळ ठोकून आहेत. ही लढत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यातील वर्चस्वाची लढाई झाली आहे. हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील व काँग्रेसचे अशोक वानखेडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नवनीत रवी राणा यांचे आव्हान असून गुणवंत देवपारे (वंचित बहुजन आघाडी) आणि बसपचे अरुण वानखेडे, हे किती मतं घेणार, यावर या निवडणुकीचा फैसला अवलंबून आहे.
या शिवाय बुलढाणा मतदारसंघात प्रतापराव जाधव (शिवसेना), डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), बळीराम सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी) अशी तिरंगी लढत आहे. अकोला मतदारसंघात संजय धोत्रे (भाजप), हिदायतुल्ला बरकतउल्ला पटेल (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), बी.सी. कांबळे (बहुजन समाज पक्ष) अशी लढत आहे. परभणीत संजय जाधव (शिवसेना) व राजेश विटेकर (राष्ट्रवादी) यांच्यात खरी लढत असली तरी आलमगीर मोहम्मद खान (वंचित बहुजन आघाडी) हे किती मतं घेणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर (शिवसेना), राणा जगजीतसिंह पाटील (राष्ट्रवादी), अर्जुन सलगर (वंचित बहुजन आघाडी), अशी तिरंगी लढत आहे. लातूरमध्ये सुधाकर शृंगारे (भाजप) व मच्छिंद्र कामत (काँग्रेस) यांच्यात खरी लढत असून वंचित बहुजन आघाडीने राम गारकर यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूरमध्ये जयसिद्धेश्‍वर स्वामी (भाजप), सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) व प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) अशी संपूर्ण राज्यातील सर्वांत लक्षवेधी तिरंगी लढत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: