Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यंदा मान्सून समाधानकारक
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 15 (वृत्तसंस्था) : देशात यंदा सरासरीच्या जवळपास मान्सून बरसेल. तो देशभर सर्वदूर, समप्रमाणात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हा अंदाज शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आहे. विशेष म्हणजे यंदा मान्सून सरासरीपेक्षा खूपच कमी असेल, असा अंदाज खासगी संस्थांनी वर्तवल्याने चिंतेचे वातावरण होते; परंतु भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाने चिंतेचे ढग दूर होण्यास मदत होणार आहे.
यंदा नैऋत्य मौसमी पाऊस समाधानकारक आणि सामान्य होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जून-ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामात पावसाची सरासरी दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के राहील, असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. दीर्घकालीन सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सामान्य समजला जातो तर 90 ते 96 टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी समजला जातो. यंदा 96 टक्के म्हणजेच सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल, असे हवामाना विभागाचे म्हणणे आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश आणि भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी पावसाचा अंदाजचे भाकीत वर्तवले. त्यांनी सांगितले, की यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये समाधानकारक पाऊस होणार आहे. दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पाऊस बरसेल. यात 5 टक्के उणे वा अधिक फरक पडू शकतो. हा पाऊस देशात सर्वदूर आणि समप्रमाणात बरसेल, असा अंदाज असून शेतकरी वर्गासाठी हे सुचिन्ह आहे. समाधानकारक पावसामुळे यंदा खरीप हंगामात चांगल्या पेरण्या होतील.
विभागवार आणि माहवार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्तविण्यात येईल. देशात मान्सूनचे आगमन कधी होईल, याचा अंदाज मे महिन्याच्या मध्यात वर्तविण्यात येईल. 2017 आणि 2018 मध्ये मान्सून सरासरीपेक्षा कमी होता. गेल्या वर्षी हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात 91 टक्के पाऊस झाला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात दुष्काळाची शक्यता 17 टक्के असून दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास पाऊस पडण्याची शक्यता 34 टक्के आहे.
यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे दुष्काळी स्थिती असण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, ‘अल निनो’चा प्रभाव कमी राहील, असा दिलासा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. ‘अल निनो’ची तीव्रता कमी होईल. जुलै-ऑगस्टमध्ये ती खूप कमी होईल. त्यामुळे चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. ‘अल निनो’चा प्रभाव जास्त असल्यास पावसाचे प्रमाण कमी असते. मात्र, हा प्रभाव एक ते दीड महिन्यात बराच ओसरेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
देशाला 2014-15 आणि 2015-16 या दोन वर्षांमध्ये दुष्काळाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मोदी सरकारसाठी ही दोन वर्षे कसोटीची होती.   
त्यातून देश 2016-17 मध्ये सावरला होता. त्यावेळी समाधानकारक पाऊस पडून देशात अन्नधान्याचे उत्पादन 275.11 कोटी मेट्रिक
टन झाले होते. 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडूनही अन्नधान्याचे अनुक्रमे 284.83 आणि 281.37 कोटी मेट्रिक टन इतके विक्रमी उत्पादन झाले होते. यंदा समाधानकारक पाऊस पडल्यास अन्नधान्याचे उत्पादनही समाधानकारक राहील, असा अंदाज आहे.
या आधी स्कायमेट या खाजगी संस्थेनेही यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. स्कायमेटने पावसाची सरासरी 93 टक्के राहील, असे म्हटले होते. हे प्रमाण 5 टक्के कमी वा जास्त होऊ शकते, असेही स्कायमेटने स्पष्ट केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: