Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात आजपासून स्टार प्रचारकांची मांदियाळी
ऐक्य समूह
Wednesday, April 17, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: lo1
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभा
5सातारा, दि. 16 : सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात स्टार प्रचारकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. उद्या दि.17 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सातार्‍यात सभा होणार असून ते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देणार की गेल्या पाच वर्षातील केंद्र शासनाच्या धोरणांचा बुरखा फाडणार  याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरे यांच्या सभे पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सुद्धा जिल्ह्यातील प्रचार सभांमध्ये सहभागी होणार असल्याने सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा लोकसभा मतदार-संघामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीकडून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि शिवसेना-भाजप-आरपीआय युतीकडून नरेंद्र पाटील यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच प्रचाराचा श्रीगणेशा केला. नरेंद्र पाटील यांनी पाटण, कराड, उ. कराडला लक्ष करीत या ठिकाणी अधिकाधिक प्रचार कसा होईल यादृष्टीने नियोजन केले आहे. याशिवाय जिल्ह्याच्या अन्य तालुक्यात नरेंद्र पाटील यांचा प्रचार धडाक्यात सुरू आहे. उदयनराजे भोसले यांनी सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावलीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून प्रचाराचे नियोजन केले आहे. जिल्हा परिषद गटनिहाय मेळाव्यांवर त्यांनी अधिक भर दिला. दरम्यानच्या काळात नरेंद्र पाटील यांनी दहशतवाद, टोलचा झोल, खासदार निधीचा मुद्दा उपस्थित करत कॉलर उडून विकासकामे होत नसतात असा घणाघात उदयनराजे भोसले यांच्यावर केला होता. उदयनराजे भोसले यांनीही मिशीला पीळ देऊन प्रश्‍न सुटत नाहीत, असे सांगत हो,  माझी नैतिक दहशत आहे, असे सांगत नरेंद्र पाटील यांचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. या उभय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सातारा लोकसभा मतदारसंघ चांगला ढवळून निघाला आहे.
राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी स्वतः उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पाटण आणि कराड तालुक्यात ठिकठिकाणी बैठका घेऊन उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवा, असे आवाहन केले होते तर नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉक्टर प्राची पाटील यांनी ठिकठिकाणी महिला मेळावे घेऊन नरेंद्र पाटील यांच्या पारड्यात मत टाकण्याचे आवाहन केले आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले आणि डॉक्टर प्राची पाटील  वैयक्तिक टीकाटिपणी न करता आपापल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.
उद्या बुधवार, दि. 17 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातारा दौर्‍यावर येत असून संध्याकाळी 6 वाजता त्यांची गांधी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्रभर सभा घेण्यास प्रारंभ केला होता. त्यांची नांदेड येथील सभा खूपच गाजली होती. त्या धर्तीवर राज ठाकरे उद्या सातार्‍यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे. उदयनराजे भोसले यांना ते पाठिंबा देतात की नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर टीका करतात हे उद्याच कळणार आहे. शिवसेना-भाजप-आरपीआय मित्रपक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना विजयी करण्यासाठी शिवसेना- भाजप युतीने कंबर कसली असून दोन दिवसापूर्वीच त्यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची कोरेगाव येथे जाहीर सभा झाली होती. त्यानंतर उद्या दि. 17 रोजी कोरेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना लक्ष्य करणार का  राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर टीकाटिपणी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आ. शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्याची ग्वाही देत तालुक्यात उदयनराजे यांच्या प्रचाराची धूळ उडवल्याने शिवसेना-भाजपने जाहीर सभेसाठी कोरेगाव हे ठिकाण निवडल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरें नंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांची सभा कोरेगावात होत असल्याने कोरेगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या बुधवारी मेढा येथे ना. एकनाथ शिंदे हजेरी
लावणार आहेत.
दि. 21 एप्रिल रोजी नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा होणार असून त्या सभेचे ठिकाण अद्याप निश्‍चित करण्यात आले नाही. सातारा, कराड यापैकी एका ठिकाणी ही सभा होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या आघाडीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष  खा. शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सभेमध्ये शरद पवार, धनंजय मुंडे केंद्र शासनाची फसवी आश्‍वासने, शेतकर्‍यांची फसवणूक, व्यापार्‍यांवर अन्याय हे कळीचे मुद्दे उपस्थित करणार असल्याने दि. 21 एप्रिलपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा जोरदार धुरळा  उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी उडी घेत आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणायचे हा चंग बांधल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात जोरदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले ही त्यांच्या जमेची बाजू समजले जाती. दुसरीकडे नरेंद्र पाटील यांच्या प्रचारात भाजपचे अध्यक्ष विक्रम पावस्कर, ना. शेखर चरेगावकर, दत्ताजीराव थोरात, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे यांनी सहभाग घेतला आहे तर दुसरीकडे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी नरेंद्र पाटील यांचा स्वतंत्रपणे प्रचार करण्याचा निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी केल्याने नरेंद्र पाटील यांच्या ताकतीमध्ये वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: