Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण डीवायएसपी डॉ. पाटील ‘अँटिकरप्शन’च्या जाळ्यात
ऐक्य समूह
Thursday, April 18, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: lo1
खंडाळा येथील लाचेचे प्रकरण
5सातारा, दि. 17 : फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ताब्यात घेतले. खंडाळा येथील फसवणुकीच्या प्रकरणात अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पावणेदोन लाख रुपयांवर तडजोड केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
कोरेगाव येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होती. या सभेसाठी डॉ. अभिजित पाटील हे बंदोबस्तासाठी तैनात होते. ही सभा संपल्यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे आणि सातारा येथील पथकांनी संयुक्त कारवाई करत   डॉ. पाटील यांना ताब्यात घेतल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. खंडाळा येथील एका फसवणुकीच्या प्रकरणात भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात फिर्यादी आणि संशयित आरोपी यांनी तडजोड करण्याचे ठरवले होते. या तडजोडीसाठी डॉ. अभिजित पाटील यांनी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपयांची मागणी त्यांनी केली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मात्र, संशय आल्याने डॉ. पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही; परंतु त्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे आणि सातारा येथील पथकांनी संयुक्त कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. याबाबत पोलीस अधिकार्‍यांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही. डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: