Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नियंत्रण रेषेवरील व्यापार स्थगित
ऐक्य समूह
Friday, April 19, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानबरोबर सुरू असलेला व्यापार केंद्र सरकारने शुक्रवारपासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी या संबंधीचा आदेश दिला. नियंत्रण रेषेवरील व्यापारी मार्गाने पाकिस्तानातून दहशतवाद्यांसाठी शस्त्रास्त्रे, अंमली पदार्थ आणि बनावट भारतीय चलनाची तस्करी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेले लोक नियंत्रण रेषेवरील व्यापारामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले काही काळ बंद असलेला व्यापार या आठवड्यात मंगळवारीच सुरू झाला होता. हा व्यापार दोन आठवड्यांपासून बंद होता. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर तोफगोळ्यांचा मारा होत असल्याने भारताने एक एप्रिलपासून तेथील व्यापार आणि    प्रवास स्थगित केला होता. आता नव्या आदेशाने नियंत्रण रेषेवरील सलामाबाद आणि चक्कन-दा-बाग या दरम्यान होत असलेला द्विपक्षीय व्यापार पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: