Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोट्या भंडलकरसह आठ जणांची टोळी तडीपार
ऐक्य समूह
Friday, April 19, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 18 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच आहे. फलटण परिसरातील गोट्या भंडलकरसह आठ जणांची टोळी एका वर्षासाठी तडीपार करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी, मारामारी, दुखापत करणार्‍या टोळीचा प्रमुख गुलाब उर्फ गोट्या उत्तम भंडलकर (वय 33) आणि शेखर संजय जाधव ( वय 23), पवन उर्फ बालाजी प्रकाश जाधव (वय 22), भगवान उत्तम भंडलकर (वय 40), गजानन दादा मदने ( वय 29), पंकज प्रकाश जाधव (वय 25), विनायक शंकर जाधव (वय 25), पृथ्वीराज उर्फ भैया प्रल्हाद चव्हाण (वय 19, सर्व रा. गुणवरे, ता. फलटण) त्यांची टोळी तयार झाली होती. त्यांनी फलटण तालुक्यात गर्दी, मारामारी, दुखापत, शिवीगाळ,दमदाटी, नुकसान करणे, असे अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये फलटण, माण, खंडाळा, कोरेगाव (जि. सातारा) आणि पुरंदर, बारामती (जि. पुणे), माळशिरस तालुका या हद्दीतून या टोळीला एक वर्ष हद्दपार केल्याचा आदेश जारी केला आहे. 
संबंधितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत होती. त्यांच्याकडून फलटण तालुका हद्दीत हिंसक घटना घडून दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांनी हद्दीबाहेर गेले पाहिजे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: