Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय
ऐक्य समूह
Friday, April 26, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 25 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वड्रा वाराणसीतून मोदींना टक्कर देणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी पूर्व उत्तर प्रदेशमध्ये (पूर्वांचल) काँग्रेसचा प्रचार करण्याची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपवण्यात आली आहे. या प्रचारात प्रियांका गांधींना स्थानिक जनतेचा प्रतिसाद लाभत असल्याने त्यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढवावी, या मागणीने काँग्रेसमध्ये जोर धरला होता. प्रियांका गांधींनीही तसे सूचक वक्तव्य केल्याने त्या वाराणसीतून निवडणूक लढवणार, अशी काँगे्रस कार्यकर्त्यांची धारणा झाली होती. त्यातच पक्षाध्यक्षांनी सांगितल्यास वाराणसीतून निवडणूक लढायला आवडेल, असे त्यांनी स्पष्ट केल्याने याबाबतच्या चर्चेला जोर आला होता. मात्र, काँग्रेसने आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत वाराणसीतून अजय राय यांचे नाव निश्‍चित झाल्याने प्रियांका गांधींबाबतची चर्चा फोल ठरली आहे.
गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यावेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी मोदी लाटेत केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला होता तर काँग्रेसचे अजय राय तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यामुळे राय यांना काँग्रेसने पुन्हा वाराणसीतून तिकीट दिल्याने तेथील लढत एकतर्फी झाली आहे.
मोदींविरोधात पुन्हा शड्डू ठोकणार्‍या अजय राय यांनी पाच वेळा आमदारकी भूषवली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अजय राय भाजप आणि समाजवादी पक्षात होते. वाराणसीमधून त्यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवली होती.
1996 ते 2007 पर्यंत ते तीन वेळा भाजपकडून आमदार होते. भाजपच्या विद्यार्थी शाखेपासून अजय राय यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 1996 साली त्यांनी कोलासला विधानसभा मतदारसंघातून नऊ वेळा आमदारकी भूषवणार्‍या नेत्याचा पराभव केल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले होते. भाजपाने 2007 साली तिकीट नाकारल्यानंतर अजय राय यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन  आधी समाजवादी पक्ष आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: