Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या पत्नी कलावती यांचे निधन
ऐक्य समूह
Friday, April 26, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 25 : थोर स्वातंत्र्यसेनानी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या पत्नी आणि सध्या लोकपाल समितीचे न्यायिक सदस्य असलेल्या न्या. दिलीप भोसले यांच्या मातोश्री श्रीमती कलावती भोसले (वय 95) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर चंदनवाडी, मरीन लाईन्स येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळचे कलेढोण, ता. खटाव येथील असलेल्या बाबासाहेब भोसले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. त्यांनी इंग्लंडमध्ये वकिलीचा अभ्यास करून बॅरिस्टर ही   पदवी मिळवली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या 1982-83 या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या विकासात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या वाटचालीत पत्नी कलावती यांची मोलाची साथ लाभली होती. बॅ. बाबासाहेब भोसले यांच्या वकिली व्यवसायाचा वारसा त्यांचे चिरंजीव दिलीप भोसले यांनी पुढे चालवताना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत झेप घेतली. न्या. भोसले यांची 2001 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून आणि दोन वर्षांनी कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. न्या. दिलीप भोसले यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले होते. ते 2018 साली न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकपाल समितीच्या न्यायिक सदस्यपदी यावर्षी 23 मार्च रोजी नियुक्ती केली. या पदावरून ते वयाच्या 70 व्या वर्षी निवृत्त होतील. न्या. दिलीप भोसले यांचे अनेक मान्यवरांनी सांत्वन केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: