Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधी सादर करणार माफीनामा ‘चौकीदार चोर है’ : सुप्रीम कोर्टाने फटकारले
ऐक्य समूह
Thursday, May 02, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : ‘चौकीदार चोर है’ हे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी जोडल्याबद्दल दोन वेळा प्रतिज्ञापत्राद्वारे फक्त ‘खेद’ व्यक्त करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणी सपशेल माफीनामा सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या अवमान याचिके संदर्भात आज झालेल्या सुनावणीत 22 पानी प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. त्यानंतर राहुल गांधींच्यावतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयाची माफी मागितली असता न्यायालयाने राहुल गांधींना नवे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची संधी तिसर्‍यांदा दिली.
राफेल विमान खरेदी कराराबाबतची प्रसारमाध्यमांमधून उघड झालेली गोपनीय कागदपत्रे पुरावा म्हणून विचारात घेतली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीत स्पष्ट केले होते. या प्रकरणी केंद्र सरकारचे आक्षेप न्यायालयाने फेटाळले होते. मात्र, या आदेशाचा आधार घेत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘चौकीदार चोर है’ हे आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे, असे राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी स्वत:ची वक्तव्ये घालणे, हा न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत खेद व्यक्त केला होता. त्याला लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी आक्षेप घेतल्यावर राहुल गांधी यांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यातही त्यांनी या वक्तव्याबाबत फक्त ‘खेद’ व्यक्त केला होता.
त्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या याचिकेवर पुन्हा सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्रातील शब्दप्रयोगावर नाराजी व्यक्त केली.
 प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांच्यावतीने ‘खेद’ व्यक्त करताना त्या शब्दाला कंस केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. खेद (रिग्रेट) व्यक्त करण्यासाठी 22 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाते का? खेद हा शब्द कंसात लिहिण्याचा अर्थ काय काढायचा, असे सवाल न्यायालयाने केले. त्यानंतर राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. राहुल गांधी हे या वक्तव्याबद्दल माफी मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यावतीने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढच्या सोमवारपर्यंतचा वेळ द्यावा. अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात ‘माफी’ या शब्दाचा उल्लेख करण्यात येईल, असे सिंघवी यांनी नमूद केले. त्यावर न्यायालयाने सोमवारच्या आधी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. मात्र, ते प्रतिज्ञापत्र स्वीकारायचे की नाही, हे आम्ही ठरवू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.
दरम्यान, सिंघवी यांनी ‘रिग्रेट’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘माफी असाच आहे, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी हे स्वत:ला सुशिक्षित म्हणवतात, पण प्रतिज्ञापत्रात म्हणतात, की न्यायालयाच्या आदेशाचे मी विश्‍लेषण केलेले नाही अथवा तो वाचलेला नाही. त्यानंतर तीनच तासांनी प्रचार सभेत बोलताना ‘चौकीदार चोर है’ पुन्हा म्हणतात. हा कुठल्या प्रकारचा खेद आहे, असा सवाल रोहतगी यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: