Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नक्षलवाद्यांविरुद्ध योजना तयार
ऐक्य समूह
Friday, May 03, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: mn3
5गडचिरोली, दि. 2 (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत महाराष्ट्र दिनी भूसुरुंग स्फोट घडवणार्‍या नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी आमची योजना तयार आहे. त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल. ते तुम्हाला लवकरच कृतीतून दिसेल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी नक्षलवाद्यांना दिला आहे.
महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. यामध्ये 15 पोलीस शहीद झाले तर खाजगी वाहनाचा चालकही ठार झाला. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी आज गडचिरोलीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नक्षलींना इशारा दिला. नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेल्या गाडीच्या चालकालाही शहिदाचा दर्जा दिला जाईल. त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत केली जाईल, असे जयस्वाल म्हणाले.
नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे हा स्फोट घडवून आणला. त्यासाठी कशाचा वापर केला आणि नक्षलवाद्यांच्या कुठल्या दलाने हा स्फोट घडवून आणला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याने आमचे मनोबल खच्ची होणार नाही. आम्ही नक्षलवादाविरोधात पूर्ण ताकदीने कारवाई करू. आमचा प्लॅन तयार आहे. यापूर्वी झालेल्या चुका सुधारू, असे जयस्वाल यांनी सांगितले. निवडणुकीत बाधा आणायचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न आम्ही मोडून काढल्याने नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. पोलीस दल गाफिल नव्हते. परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाईत सुधारणा करू. मी स्वतः गडचिरोलीत पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आव्हानांचा सखोल अभ्यास करू. पुन्हा अशा घटना होणार नाहीत, याची काळजी घेऊ, असे जयस्वाल
यांनी स्पष्ट केलं.
छत्तीसगड हल्ल्याचा सूत्रधार ठार
दरम्यान, छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा सूत्रधार मादवी मुय्या हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. 9 एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये भाजपचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता तर पाच जवान शहीद झाले होते. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याचा सूत्रधार मादवी मुय्या याच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते. त्याचा चकमकीत खात्मा झाला. पोलिसांनी एक रायफल आणि सहा काडतुसे जप्त केली आहेत. दंतेवाडा येथे झालेल्या हल्ल्याचाही तोच सूत्रधार होता. त्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते तर दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू झाला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: